
निवजे, गोठोसमधील शेतकऱ्यांसाठी योजना
86705
गोठोस ः येथे शासनाच्या सुविधा संपन्न कुटूंब मिशनचा शुभारंभ करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बीडीओ विजय चव्हाण, प्रकाश मोर्ये. (छायाचित्र ः अजय सावंत)
निवजे, गोठोसमधील शेतकऱ्यांसाठी योजना
सुविधा संपन्न कुटूंब मिशन; कुडाळ पंचायत समितीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः निवजे व गोठोस गावातील शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत गोठे, गोबरगॅस, गांडूळ युनिट, खत विहिरी देण्यात येणार आहेत. यासाठी शासनाच्या सुविधा संपन्न कुटूंब मिशनचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते नुकताच झाला. दोन्ही गावातील १५५ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी येथील पंचायत समितीने विधायक पावले टाकली आहेत.
जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायत व ७५० महसूल गावे आहेत. सर्वाधिक दूध संकलन करणारी गावे म्हणून निवजे व गोठोस गावाची ओळख आहे. या दोन्ही गावातील शेतकरी हरयाणा व पंजाब येथून म्हशी आणून दूध संकलन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हात बळकट करणे, रोजी-रोटी उपलब्ध करून देणे, या अनुषंगाने प्रशासनाचा हात मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून येथील पंचायत समितीने सर्वांगीण विकास सुविधा संपन्न कुटुंब मिशन अभियान अंतर्गत राबवण्यासाठी वाटचाल केली आहे. निवजे गावातील ९१ शेतकऱ्यांसाठी गोठे, ५४ शेतकऱ्यांसाठी गांडूळ युनिट, ८ जणांना विहिरी तर गोठोस गावात ६५ शेतकऱ्यांसाठी गोठे, गांडूळ कुक्कुटपालनासाठी शेड खत आदी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, गोठोस ग्रामसेवक गुरुनाथ गावडे, निवजे ग्रामसेवक सुषमा कोनकर, दोन्ही गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी महिला वर्ग, लाभार्थी आदी उपस्थित या उपक्रमामुळे गोठोस व निवजे येथील १५५ शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.
--------
चौकट
नरेगा मजुरांसोबत एक दिवस
या मोहिमेच्या निमित्ताने मूख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी नरेगाच्या मजुरांसोबत एक दिवस घालवून त्याच्याशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न आदी समजून घेतले
---------------
कोट
शासनाच्या सुविधा संपन्न कुटूंब मिशनचा शुभारंभ गोठोस व निवजे गावात करण्यात आला आहे. कुडाळ पंचायत समितीने यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांचे सहकार्य लाभले आहे.
- विजय चव्हाण, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, कुडाळ