
अख्यायिकांचे अख्यान
rat०४१२.txt
बातमी क्र..१२ (पान ६ साठी, सदर)
(२६ फेब्रुवारी पान सहा)
आख्यायिकांचे आख्यान............लोगो
फोटो ओळी
-rat४p१.jpg ः
८६८०९
धनंजय मराठे
-rat४p३.jpg ः
८६८१०
दुर्गादेवीची मूर्ती
-
राजापूर तालुक्यातील ओझर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गावं. या ठिकाणी जायचं झालं तर राजापूर ओणी या महामार्गावर पाचल फाटा लागतो. या पाचल रस्त्याला ओझर तिवरे फाट्याने सहा-सात कि.मी. आत गेलं की हे सुंदर टुमदार गावं. विस्तीर्ण पठार अर्थात सडे पार करायचे आणि वळणांवळणाच्या रस्त्याने गावतल्या वाडीवस्तीत जायचे..विस्तीर्ण जांभ्या दगडाची ही पठारं रूक्ष दिसली तरी माणसाची तहान भर उन्हाळ्यात या सड्यांमुळे भागते. जांभा दगड पावसाचे पाणी पितो म्हणजेच शोषून घेतो आणि जांभ्या सड्याच्या तळी असलेल्या काळ्या दगडावर हे पाणी साठून राहते. अशा या कोकणपण मिरवणाऱ्या गावात भग्न मूर्ती मंदिरात ठेवलेली का याची रोचक कथा ...
धनंजय मराठे, राजापूर
--
सौंदळ गावात वझरकडा कसा....
ओझरच्या सड्यांवर मनुष्यवस्ती फारशी नसली तरी या ठिकाणी खरीची भातशेती मात्र उत्तम होते. कोकणी मेवा करवंद, चिकणं, तोरणं, आटकं, हसोळं तसेच वनौषधी विपुल प्रमाणात याच सड्यांवर आढळतात. सड्यांवरील गावठण भागात गुराखी आपली गुरे चरण्यासाठी घेऊन जातात. श्रावण भाद्रपदात तर हे सडे विविध फुलांच्या रंगानी नटले सजलेले दिसतात. उत्तम आरोग्यासाठी आवश्यक रानभाज्या याच सड्यांवर आढळतात. याच सड्याच्या कळसावरून खाली वसलेली गावं न्याहाळता येतात. ओझर हे गाव सड्यावरून पाहिले असता बशीच्या खोलगट भागासारखे दिसते. या आकाराला बाउल शेप असेही म्हणतात. साहजिकच या खोलगट भागात पावसाळ्यात पाणी साठणार असे कोणालाही वाटणे स्वाभाविकच.
या ओझर गावात दुर्गादेवी, रवळनाथ इ. मंदिरे आहे. श्री दुर्गादेवी गाववस्तीपासून थोडी लांब; पण गावातच तर रवळनाथांचे मंदिर गावापासून थोडं लांब उंचावरील देवडोंगर टेकडीवर आहे. या दुर्गादेवी मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यावर दुर्गादेवीच्या डाव्या बाजूला काहीशा अंतरावर एक भग्न मूर्ती दिसते. या मुर्तीच्या एका पायाचे ढोपरापासून तीन भग्न भाग झाले आहे हे दिसून येते. शक्यतो भग्न मूर्ती मंदिरात ठेवत नाहीत तरी पण ही भग्न मूर्ती इथे कशी याचा मी विचार करत गावात चौकशी केली. गावचे मानकरी राजू सरखोत म्हणाले, ही पहिली दुर्गादेवीचीच मूर्ती; पण विसर्जित करायला या देवीचा कौल नाही असे सांगितले. दुर्गादेवीच्या भग्न पायाविषयी ते सांगू लागले. कोणे एकेकाळी या गावात खूप पाऊस झाला. पावसाचे पाणी या गावात साठून पूर परिस्थिती निर्माण झाली, असे वाडवडील सांगत. गावकरी या पूरपरिस्थितीने भयभित झाले. पुराचे पाणी हा हा म्हणता वाढतच होतं. गावातील पूरपरिस्थिती पाहून देव रवळनाथ देवडोंगरावर जाऊन बसला.अशा परिस्थितीत आतां गावातील लोकांचा जीव धोक्यात येऊ लागला. गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र झाले. त्यांनी देवी दुर्गादेवी मातेचा धावा केला. देवीदुर्गेला साकडं घातलं. "गावावरचं हे संकट दूर कर गे आई" देवीचा कौल घेतला. आतां गाव आशेने देवीची मनोमन प्रार्थना करत होते. देवी भक्तांच्या, गावकऱ्यांच्या आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी धावून आली. गावाच्या सौंदळ ओझर वेशीवरील एका मोठ्या काळ्या कड्याला देवीने आपल्या पायाने जोरदार प्रहार केला. भलीमोठी काळी धोंड कोसळली आणि काय आश्चर्य पाण्याने भरलेला फुगा टाचणी लावून फटदिशी क्षणात फुटून पाणी बाहेर पडते अगदी तसेच गावातील पूरपरिस्थिती काही वेळात मोकळी झाली आणि सौंदळ ओझरकडा या रूपात हा ओझरकडा म्हणून धबधबा उदयास आला.
देवी ज्या पावले गेली त्या पावले परत आली; पण ज्या पावले आली त्या भागातील जमीन रक्ताळलेली झाली. देवी ज्या दगडधोंड्यावरून ओलांडून गेली त्या दगडधोंड्यामध्ये रक्ताचे डाग आजही दिसून येतात, असे गावकरी सांगतात. या प्रसंगाचा सामना करताना देवीचा पाय मोडला आणि तो मोडलेला पाय धबधब्याच्या डोहात गेला. मोडलेला पाय शोधण्याची वेळ आली. गावकऱ्यांच्यात असे ठरले की, मोडलेला पाय ज्या गावातील गावकरी पाणबुडे शोधतील त्या गावचे नाव त्या ठिकाणच्या धबधब्याला दिले जाईल. शोध प्रयत्नांती ओझरच्या ग्रामस्थांना हे भग्न पाय मिळाले म्हणून सौंदळ भागातील या धबधब्याला ओझर किंवा वझरकडा असे नाव पडले. म्हणून दुर्गादेवीची भग्नावस्थेतील मूर्ती या मंदिरात आहे. तिचे विसर्जन केलेले नाही.
(लेखक लोकजीवन अन् लोकरितीचे अभ्यासक आहेत.)
-