
कुडाळमध्ये महास्वच्छता अभियान
86825
कुडाळ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्यात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळमध्ये महास्वच्छता अभियान
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; ६.५ टन कचऱ्याचे संकलन
कुडाळ, ता. ४ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग (जि. रायगड) यांच्यावतीने कुडाळ तालुक्यात तहसीलदार कार्यालय परिसरासह अन्य ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली काही वर्षे प्रतिष्ठानतर्फे देशविदेशात असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री विभूषित तथा महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात तसेच देशाबाहेरही असे विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विहीर स्वच्छता, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, शैक्षणिक साहित्य वाटप, श्रवण यंत्र वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गांडूळ खत प्रकल्प, निर्माल्यापासून खत निर्मिती, जलपुनर्भरण, पाणपोई, बसथांबे स्वच्छता आदी विविध उपक्रम राबविले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणपोई, जलपुनर्भरण, महास्वच्छता अभियान तसेच जातीचे व इतर दाखले वाटप, तैलचित्र प्रदर्शनातून जनजागृती आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ मार्चला येथील तहसीलदार कार्यालय परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये ३३० सदस्यांनी सहभागी होऊन ६.५ टन कचरा गोळा केला. यात श्री समर्थ बैठक पिंगुळी सभागृह, गावराई व परुळे बैठकीतील सदस्य सहभागी झाले होते. तहसीलदार अमोल पाठक यांनी अभियान प्रसंगी भेट दिली.
..............
चौकट
जिल्ह्यातून ११०.५ टन कचरा गोळा
या अभियानामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या श्रीसमर्थ बैठकीतून २०१० सदस्य सहभागी झाले. यामध्ये ओला व सुका कचरा मिळून देवगड येथे अंदाजे ८ टन, वैभववाडी ८ टन, कणकवली १० टन, मालवण ३ टन, कुडाळ ६.५ टन, सावंतवाडी ५० टन तसेच वेंगुर्ले २५ टन असा मिळून एकूण सुमारे ११०.५ टन कचरा गोळा करण्यात आला.