
‘आमचा बी विकास होऊद्या की’
86828
गोठोस ः येथे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी धनगरी वेश समाजबांधव, मजुरांशी संवाद साधला. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘आमचा बी विकास होऊद्या की’
धनगर बांधवांची साद; गोठोस, निवजेला सीईओ नायर यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी गोठोस येथे धनगरी वेश परिधान करीत मजुरांशी संवाद साधला. ‘काठी नि घोंगडं घेऊ द्या की रं, आमचा बी विकास होऊ द्या की...’, अशी साद धनगर बांधवांसह मजुरांनी यावेळी दिली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नरेगा अंतर्गत ही आगळीवेगळी भेट लक्षवेधी ठरली.
‘नरेगा मजुरासोबत एक दिवस’ मोहिमेच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी नरेगाच्या मजुरांसोबत एक दिवस घालवून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे विविध प्रश्न समजून घेतले. तालुक्यातील निवजे व गोठोस या दोन्ही गावांतील लोकांना नरेगा अंतर्गत गोठे, गोबरगॅस, गांडूळ खत युनिट, विहिरी देण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) झाला. दोन्ही गावांतील १५५ शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने पाऊल टाकले आहे. या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी हरयाणा व पंजाब येथून म्हैशी आणून दूध संकलन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या जनावरांसाठी चांगले गोठे तयार करण्याची सुरुवात पंचायत समितीमार्फत करण्यात आली. एका जनावरासाठी ७७ हजार अनुदान दिले जाते. त्याला जोडूनच गोबर गॅस पूरक योजना असून गांडूळ युनिट दिल्यास अधिक जोड मिळणार आहे. खत निर्मिती कशी करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नरेगा अंतर्गत विहिरींचासुध्दा लाभ दिला जाणार आहे. या अनुषंगाने निवजे गावातील ९१ शेतकऱ्यांसाठी गोठे ५४ व गांडूळ खत युनिट, ८ जणांना विहिरी, तर निवजे गावात ६५ शेतकऱ्यांसाठी गोठे गांडूळ खत युनिट, कुक्कुटपालनासाठी शेड आदी उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमामुळे गोठोस व निवजे येथील १५५ शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. यासाठी कुडाळ पंचायत समितीने पावले उचलली असून जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान, झाराप यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली.
---
धनगर बांधवांच्या वस्तीलाही भेट
या उपक्रमांतर्गत बुधवारी गावांत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी योजनेचा प्रारंभ केला. काही उपक्रमांची पाहणी केली. यावेळी धनगर समाजाच्या वस्तीलाही भेट दिली. सीईओ नायर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विशेष म्हणजे खांद्यावर घोंगडी, हातात काठी, टोपी असा धनगरी वेष परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, गोठोस ग्राममसेवक गुरुनाथ गावडे, निवजे ग्रामसेवक सुषमा कोनकर, दीपक खरात आदींसह दोन्ही गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, महिला वर्ग, लाभार्थी आदी उपस्थित होते.