‘स्वाभिमानी’च्या लढ्यामुळे सफाई कामगारांना न्याय

‘स्वाभिमानी’च्या लढ्यामुळे सफाई कामगारांना न्याय

86829
प्रसाद गावडे

‘स्वाभिमानी’मुळे सफाई कामगारांना न्याय

सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांना वारसाहक्क लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेच्या लढ्याला यश आले असून महाराष्ट्र शासनाकडून लाड पागे समितीच्या शिफारशी सरसकट सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटनेने आवाज उठवून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत महाराष्ट्र शासनाचे चुकीच्या धोरणांबाबत लक्ष वेधले होते. शौचालय स्वच्छता, मलनि:सारण व्यवस्था, नाली-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित अशा सरसकट सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. याआधी केवळ अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन निर्णय अंमलात होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांना वारसा हक्क लाभ देताना ज्या अनियमिततांमुळे खऱ्या वारसांवर अन्याय होत होता, त्या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. या संदर्भात शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना पारित करत सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. तसेच पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केले, त्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीमध्ये प्राधान्य देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सफाई कामगारांच्या वारसांना याचा लाभ मिळणार असून आयुष्यभर घाणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे. वारसाहक्क प्रस्तावासंदर्भात काही अडचणी असल्यास संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वाभिमानी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com