
साकेडीत डांबरीकरणाचे काम रोखले
86882
साकेडी : येथील सेवारस्ता डांबरीकरणाचे काम आज स्थानिकांनी रोखून धरले होते.
साकेडीत डांबरीकरणाचे काम रोखले
चुकीच्या कामामुळे स्थानिक संतप्त; अभियंत्याकडून दखल
कणकवली, ता.४ : महामार्गालगत साकेडी येथील सेवारस्ता डांबरीकरणाचे काम आज दुपारी दीडच्या सुमारास स्थानिकांनी रोखले. ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा त्रास सहन करावा लागणार असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, महामार्ग अभियंता अतुल शिवनीवार यांनी घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती समजून घेतली आणि दोन दिवसांत तेथे नवीन काम करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले.
महामार्ग चौपदरीकरणानंतर गेली तीन वर्षे रखडलेले साकेडी सेवा रस्त्याचे काम आठ दिवसांपासून सुरू आहे. यात गटार बांधकाम आणि इतर कामे झाल्यानंतर आजपासून डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. त्याला समीर पाटील, निकित मुरकर, उमेश परब आदींनी हरकत घेतली आणि काम बंद पाडले. साकेडी सेवारस्ता करताना तीन फुट उंचीचे गटार बांधले; मात्र त्या गटारात पाणी जाण्यासाठीची भोके एक ते दीड फुट उंचावर ठेवण्यात आली. त्यामुळे मुख्यरस्ता आणि सेवा रस्त्यावरून येणारे पाणी थेट स्थानिकांच्या घरात जाण्याचा किंवा सेवा रस्त्यावरच राहण्याचा धोका स्थानिकांनी व्यक्त केला. सेवारस्ता बांधताना अनेक घरांच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही. तर जेथे रस्ता ठेवला तो दोन ते तीन फुट उंच आहे. तसेच सेवा रस्त्यावरच तीन फुटाचा भराव टाकला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणारी वाहने त्यावरून आदळून अपघात होण्याचीही शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. शिवाय सेवा रस्त्यावरील अडथळे हटविल्यानंतर तेथे खडीकरण न करता मातीवरच डांबर टाकून रस्ता केला आहे. पावसात ही माती वाहून गेल्यानंतर रस्ताही वाहून जाणार असल्याचे मुद्दे स्थानिकांनी महामार्ग विभागाचे अभियंता अतुल शिवनीवार यांच्यापुढे मांडले.
---
कोट
उंच झालेली गटारे तोडून ती सेवारस्त्याच्या लेव्हलवर घ्या. सेवारस्ता दुतर्फा सुरक्षा कठडे बांधा, गटारांतील माती तातडीने काढा. अडथळे हटविले, त्या भागात पुन्हा डांबरीकरण करा, असे निर्देश केसीसी बिल्डकॉन ठेकेदाराला दिले आहेत. सर्व चुकीच्या कामांचा अहवाल वरिष्ठांना पाठवू. चुकीचे काम हटवून नव्याने बांधकाम करू.
- अतुल शिवनीवार, अभियंता, महामार्ग विभाग