डॉन बॉस्को शाळेत बारावीचे तात्पुरते केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉन बॉस्को शाळेत 
बारावीचे तात्पुरते केंद्र
डॉन बॉस्को शाळेत बारावीचे तात्पुरते केंद्र

डॉन बॉस्को शाळेत बारावीचे तात्पुरते केंद्र

sakal_logo
By

डॉन बॉस्को शाळेमध्ये
बारावीचे तात्पुरते केंद्र
सिंधुदुर्गनगरी ः कोकण विभागीय बोर्डाच्या सूचनानुसार कसाल न्यू इंग्लिश स्कूलच्या कसाल येथील बारावी बोर्ड परीक्षेच्या दोन पेपरसाठी केंद्राच्या स्थानकात बदल करण्यात आला आहे. ६ व ८ मार्चला दहावी व बारावी दोन्ही वर्गाची एकाचवेळी परीक्षा असल्याने बैठक व्यवस्थेबाबत होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून कोकण विभागीय बोर्डाने डॉन बॉस्को प्रशाळा, ओरोस येथे तात्पुरते बारावी परीक्षा उपकेंद्र मंजूर केले आहे. या केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थींची परीक्षा होणार आहे. ६ मार्चला सकाळी ११ ते २.१० या वेळेत सहकार (५३) विषय डब्ल्यू ०१४५८६ ते डब्ल्यू ०१४६३४, डब्ल्यू ०२३९०२ ते डब्ल्यू ०२४०३४ तसेच २ मार्चला सकाळी ११ ते २.१० या वेळेत जीवशास्त्र (५६) विषय डब्ल्यू ००७४८७ ते डब्ल्यू ००७६३८ या परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन केंद्रप्रमुख गुरुदास कुसगावकर यांनी केले आहे.
-----------------
कोनाळमध्ये काजू कलम बागेस आग
दोडामार्ग ः कोनाळ-गवसवाडी येथील काजू बागेत लागलेल्या आगीत लागती ४३ काजू कलमे होरपळली. यात शेतकरी सुदन बळीराम चोर्लेकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. चोर्लेकर यांच्या काजू बागेत बुधवारी (ता. १) दुपारच्या सत्रात अचानक आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग भडकली. त्यामुळे बागेतील सुमारे ४३ काजू कलमे आगीत होरपळली. या घटनेची माहिती तलाठी नागेश रामोड व सहाय्यक कृषी अधिकारी संतोष माघाडे यांना देण्यात आली. माहिती मिळताच या दोघांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. उत्पन्न देणारी काजूची झाडे आगीत होरपळल्याने चोर्लेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तातडीने भरपाई देण्याची मागणी चोर्लेकर यांनी केली आहे.
---
कांदळगाव शाळेत आठवडा बाजार
मालवण ः जिल्हा परिषद शाळा महान-कांदळगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानाची माहिती होणे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारात विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या. या बाजाराचे उद्घाटन महानचे सरपंच अक्षय तावडे यांनी केले. उपसरपंच अजित राणे, अंजली हळवे, प्रसाद जाधव, वैष्णवी पेडणेकर, सुषमा प्रभुखानोलकर आदींसह पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी खरेदीचा आनंद लुटला.
--------------
कुडाळात शुक्रवारी ‘खेळ पैठणीचा’
कुडाळ ः सहयोगिनी महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१०) दुपारी तीनला येथील महालक्ष्मी सभागृहात महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी ''पनीरपासून तिखट पदार्थ'' हा विषय देण्यात आला आहे. तसेच ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. विविध क्षेत्रांत नाव मिळविलेल्या व्यक्तींचे मंडळाकडून सत्कार होणार आहेत. महिलांसाठी विविध कार्यक्रम, समूह नृत्य आयोजित केले आहे. दुपारी तीनला महिलांनी पाककृती महालक्ष्मी सभागृहात ठेवायची आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा रुपाली शिरसाट व मंडळाने केले आहे.
-----------------
माणगावात आज वधू-वर मेळावा
माणगाव ः येथील श्री देवी यक्षिणी वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने उद्या (ता. ५) सकाळी दहाला माणगाव ग्रामपंचायत हॉल येथे सर्व समाजातील वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींसाठी नाव नोंदणी मोफत आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.