रत्नागिरी ः रत्नागिरी, सिंधुदुर्गातील उद्योगक्षेत्राला उतरती कळा

रत्नागिरी ः रत्नागिरी, सिंधुदुर्गातील उद्योगक्षेत्राला उतरती कळा

कोकणच्या उद्योगक्षेत्राला उतरती कळा
२४४ कारखान्यांची धडधड थांबली; दोन जिल्ह्यात २ हजार ६५४ कारखाने सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० औद्योगिक वसाहतींमधील औद्योगिक विकास रोडावलेलाच आहे. मोठे उद्योग येण्याच्या फक्त घोषणाच होत आहेत. प्रत्यक्षात मात्र येणाऱ्या उद्योगाला प्रदुषणाचे कारण पुढे करत विरोध होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला उतरती कळा लागली आहे. उद्योगमंत्री जिल्ह्याच्या औद्योगीक क्रांतीसाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी बंद पडलेले काही कारखाने सुरू करण्याची घोषणा केली तरी जिल्ह्याचा अपेक्षित औद्योगिक विकास खुंटलेलाच आहे. दोन्ही जिल्ह्यात छोटे-मोठे २ हजार ६५४ कारखाने आहे. त्यापैकी २४४ कारखान्यांची धडधड थांबली आहे.
रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाने शासनाला दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक स्थितीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये ही वस्तुस्थिती पुढे आली आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्यादृष्टीने ही बाब चिंतेची आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनतरी २ हजार ६५४ कारखाने तग धरून असले तरी अजून कारखानदारी वाढण्याची गरज असून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कोकणवासीयांना मोठी आशा आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यात रत्नागिरी-झाडगाव, रत्नागिरी-मिरजोळे, लोटे, लोटे परशुराम, खेर्डी चिपळूण, गाणे खडपोली, साडवली-देवरूख, दापोली, दाभोळ आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) अशा १० औद्यागिक वसाहती आहेत. या एमआयडीसीमधील २ हजार ९४८भूखंड आहेत. त्यापैकी २ हजार ६५४ आरक्षित झाले असून, त्यावर छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यापैकी अनेक भुखंडांवर फक्त छप्पर मारले किंवा कच्चे बांधकाम करून ठेवले आहे. प्रत्यक्ष किती उद्योग सुरू हा संशोधनाचा विषय आहे. नवीन छोटे-मोठे कारखाने आले तर हातांना रोजगार मिळणार आहे. त्याला जोडून नवे उद्योग सुरू होणार आहेत. त्यामुळे आता मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे.

चौकट
उद्योगमंत्री सामंत यांच्याकडून अपेक्षा
नव्या सरकारमध्ये उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर उदय सामंत यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आणून रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी राज्यासह जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मिऱ्या बंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी त्यांनी सुरू केली. वेरॉन इंडस्ट्रिजदेखील सुरू केल्याची घोषणा केली आहे. सर्वांत मोठा बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठीही त्यांचा प्रयत्न सुरू आहे; परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष उद्योग सुरू होत नाहीत, तोपर्यंत आर्थिक सुबत्ता येणार नाही.

चौकट-
मोठ्या उद्योग विरोधामुळेच रखडले
जिल्ह्यातील नाणार (ता. राजापूर) येथे मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प विरोधामुळे रद्द झाला. आता तोच प्रकल्प बारसू (ता. राजापूर) येथे होण्याच्या हालचाली सुरू आहेत. खेडमध्ये कोकोकोलाचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्यालाही विरोध होत आहे. वाटद येथे नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहे त्यालाही विरोध झाला आहे. माजी केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी कागदाचा कारखाना, रेल्वेचा मोठा कारखाना येणार, अशा घोषणा केल्या होत्या. झाडगाव औद्योगिक वसाहतीतील स्टर्लाइटचा मोठा प्रकल्प ग्रामस्थांनी हाकलून लावला. ती हजारो एकर जमीन पडून आहे.


चौकट- १
एमआयडीसी एकूण प्लॉट चालू उद्योगासाठी बंद कारखाने

रत्नागिरी- झाडगाव २४७ २३५ १२
रत्नागिरी- मिरजोळे ८२० ८०० २०
लोटे ४७८ ४१२ ६६
लोटे परशुराम ३० ०० ३०
खेर्डी-चिपळूण १४३ १३३ १०
गाणे खडपोली १६९ १४८ २१
साडवली-देवरूख ६५ ६० ५
दापोली ४९ ३८ ११
दाभोळ ८७ ३७ ०
कुडाळ ८६० ७९१ ६९
-------------------------------------------
एकूण २,९४८ २,६५४ २४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com