
वनडे, टी-ट्वेंटीत ‘सायन-मुंबई’ अजिंक्य
86934
मालवण ः एकदिवसीय, टी-ट्वेंटीचे अजिंक्यपद मिळविणारा गुरुनानक हायस्कूल सायन मुंबई संघ.
वनडे, टी-ट्वेंटीत ‘सायन-मुंबई’ अजिंक्य
मालवणातील क्रिकेट स्पर्धा; आदित्य तिवारी मालिकावीर
मालवण, ता. ४ : शांती अॅवॉर्डस आणि नॉव्हेल्टीज यांच्यातर्फे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाले ट्रॉफी स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात गुरुनानक हायस्कूल सायन-मुंबई संघाने १३ धावांनी विजय साकारत मालवण शालेय संघाचा पराभव केला. गुरुनानक हायस्कूल सायन मुंबई संघाने एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी या दोन्ही मालिकांचे अजिंक्यपद पटकावले.
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर आज गुरुनानक हायस्कूल, सायन-मुंबई विरुद्ध मालवण शालेय संघ असा २० षटकांचा सामना झाला. मालवण शालेय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गुरुनानक हायस्कूल, सायन-मुंबई या संघांनी निर्धारित २० षटकात १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मालवण शालेय संघ ९४ धावाच करू शकला. गुरुनानक हायस्कूल, सायन-मुंबई या संघाने आजचा सामना १३ धावांनी जिंकला.
आजच्या सामन्यात फलंदाजीमध्ये अम्मार खान याने २०, चंदन धुरी १५, तेजस वस्त २८, ओम याने २० धावा केल्या. तर गोलंदाजीमध्ये हर्षल सिन्हा याने १० धावात ५ बळी घेतले. तर आकाश याने १, अंश दुबे १, तेजस वस्त २, पुरुषोत्तम चौधरी याने २, आणि आर्यन सिंग याने १ गडी बाद करून गोलंदाजीमध्ये चमक दाखविली. मालिकावीर म्हणून आदित्य तिवारी, सामनावीर म्हणून हर्षल सिन्हा, उत्तेजनार्थ खेळाडू म्हणून आकाश मिठबावकर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून चंदन धुरी यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना सुजित सिन्हा यांच्यातर्फे स्मरणचिन्हे देण्यात आली. गुरुनानक हायस्कूलच्या प्राचार्या माधवी नाईक यांनी ही क्रीडास्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.