निरवडेत विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरवडेत विहिरीत पडून
शाळकरी मुलाचा मृत्यू
निरवडेत विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

निरवडेत विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

sakal_logo
By

86989
आरोह खरात
86990
निरवडे ः येथील याच विहिरीत पडून आरोह याचा मृत्यू झाला.

निरवडेत विहिरीत पडून
शाळकरी मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः निरवडे-भंडारवाडी येथे विहिरीत पडल्यामुळे आज शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आरोह जानू खरात (वय ९) असे त्याचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खरात कुटुंबाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीचे काही दिवसांपूर्वीच खोदकाम केले होते. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. शनिवार असल्याने आरोह सकाळी शाळेतून लवकर घरी परतला. घरात दप्तर ठेवून खेळायला जातो, असे सांगून तो त्याचा भाऊ आणि मित्रासोबत घरातून बाहेर पडला. खेळत असताना लगत असलेल्या विहिरीत तो पाय घसरून पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मुलाने त्याच्या घरी धावत जात घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तत्पूर्वीच तो विहिरीतील पाण्यात बुडाला होता. त्याला बाहेर काढून तत्काळ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी दिला. त्यानुसार त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले; मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले.
या घटनेची माहिती उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी पोलिसांना दिली. येथील पोलिस ठाण्यात नोंद आहे. घटनेची माहिती मिळताच निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे, सदा गावडे, उपसरपंच पेडणेकर, रॉनी फर्नांडिस, बाबल मयेकर, सुहास गावडे, नैनेश गावडे, अमरनाथ बागकर, अजय तानावडे, योगेश तळवणेकर आदींसह ग्रामस्थ रुग्णालय परिसरात दाखल झाले होते. आरोह याला क्रिकेटची आवड होती. त्याचे वडील मोलमजुरीची कामे करतात. त्याच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.