महामार्गावरील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद
महामार्गावरील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद

महामार्गावरील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद

sakal_logo
By

87070
पणदूर ः पणदूर आणि वेताळबांबर्डे येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंदावस्थेत आहे.

महामार्गावरील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद

पणदूर, वेताळबांबर्डेतील स्थिती; थकीत बिलांमुळे वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलिस दलाच्या मदतीसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून पणदूर आणि वेताळबांबर्डे येथे बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा मागील काही महिने बंदावस्थेत आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेच्या वीजपुरवठ्याची बिले भरायची कोणी, या पोलिस आणि संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या वादात ही यंत्रणा बंद पडल्याचे समजते.
संबंधित सीसीटीव्हीची गेल्या अनेक महिन्यांची वीज बिले थकित असल्याने महावितरण विभागाने वीजपुरवठा खंडित केला. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा नादुरुस्त होऊ नये, यासाठी संबंधित एजन्सीने दोन्ही गावांतील महामार्गावरचे कॅमेरे काढले. त्यामुळे दोन्ही गावांत महामार्गावरची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. महामार्गावरील ही सीसीटीव्ही यंत्रणा कुडाळ पोलिस ठाणे आणि जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष या ठिकाणी जोडून पोलिस प्रशासनाकडून परिसरात लक्ष ठेवण्यात येते. यामुळे अपघात करून पळून गेलेली वाहने तसेच अन्य घटनांमधील वाहने आणि संशयितांचा शोध घेणे सोपे होते; मात्र पणदूर आणि वेताळबांबर्डे येथील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणाच मागील काही महिने बंद आहे. यासाठी करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्याची वीज बिले थकीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने वीज बिले भरणा केली नसल्याने महावितरण विभागाने या यंत्रणेचा वीजपुरवठाही खंडीत केला आहे. पणदूर येथील सुमारे ४५ हजार रुपये, तर वेताळबांबर्डेतील १५ हजार रुपये अशी वीज बिले थकीत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र, अद्याप दोन्ही ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही यंत्रणेची वीज बिले भरलेली नाहीत. त्यामुळे महावितरणने या सेवेचा वीजपुरवठा खंडित केला. याबरोबरच पणदूर तिठा पोलिस प्रशासनाची पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टिमही बंद आहे. पणदूर येथील बॉक्सेल, सेवारस्ता व महामार्ग दुभाजक येथे, तर वेताळबांबर्डे येथे बॉक्सेल आणि ब्रीजवर कॅमेरे बसविण्यात आले होते; मात्र सध्या तेबंदावस्थेत असल्याने कॅमेरे सर्व्हेलन्स यंत्रणेवर ‘सिंधुदुर्ग पोलिस’, असे स्टिकर लावण्यात आले आहे.
---------
प्रशासनाचे वेधले लक्ष
मोठा गाजावाजा करून प्रशासनाने हे कॅमेरे कार्यान्वित केले होते; मात्र वीज बिले भरणे ग्रामपंचायतींना परवडणारे नसल्याने तसेच ही यंत्रणा पोलिस प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने वीज बिले भरायची कोणी, या ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाच्या वादात सीसीटीव्ही यंत्रणा सापडली आहे. जिल्हा परिषद, पोलिस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने एकत्रितपणे यावर तोडगा काढून बंद झालेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.