
शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना स्थगिती
शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना स्थगिती
सुनील तटकरे ;कोकणातील पर्यटन विकास खोळंबला
दाभोळ, ता. ५ : महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पर्यटन वाढीकरिता विस्तृत योजना आखली होती. तत्कालीन पर्यटन मंत्री आदिती तटकरेंच्या माध्यमातून कोकणासाठी मोठ्याप्रमाणात निधीही दिला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यावर सर्व विकासकामांना स्थगिती दिली. यामुळे कोकणातील पर्यटन विकास खोळंबला असून विकासकामांना स्थगिती देणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली.
केळशी - उटंबर येथीज हजरत पीर याकूबबाबा सरवरी दर्गा ट्रस्टतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकुबबाबांच्या उर्स कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, सत्तेवर आल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणासाठी दिलेल्या देवस्थान व पर्यटन निधीला स्थगिती दिली. या सरकारकडे मनाचा मोठेपणा नसल्याचे त्यांनी कामांना स्थगिती देऊन दाखवले आहे. मात्र आपण याविरोधात न्यायालयात जाऊन स्थगिती उठवली आहे. तटकरे यांनी कोकणामध्ये कोणत्या देवस्थान व पर्यटनस्थळाना किती कोटी निधी दिला याची यादी वाचून दाखवली. यावेळी माजी आमदार संजय कदम यांनीही मार्गदर्शन केले.यावेली महाराष्ट्र वक्फ बोर्डचे सदस्य डॉ. मुदस्सर लांबे, मुस्ताक मिरकर, दर्गा अध्यक्ष मकबूल दिनवारे, सचिव जहूर झोंबडकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदिप राजपुरे, अजय बिरवटकर यांचेसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.