
बापर्डेत उद्योजकता परिचय कार्यक्रम
87152
बापर्डे ः येथे काथ्यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास एकदिवशीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
बापर्डेत उद्योजकता परिचय कार्यक्रम
काथ्या उद्योगाबाबत माहिती; ‘एमसीइडी’ सिंधुदुर्गचा पुढाकार
देवगड, ता. ५ ः राज्याच्या ‘महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीइडी) सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तालुक्यातील बापर्डे येथील ग्रामपंचायत सभागृह झाला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बापर्डे सरपंच संजय लाड, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे, ग्रामसेवक शिवराज राठोड, मास्टर ट्रेनर तुषार चव्हाण, संदीप नाईकधुरे, अजित राणे, जीवन नाईकधुरे, ग्रामपंचायत सदस्य सुविधा पुजारे, दिशा वासगे, संतोष नाईकधुरे, गुणवंत राणे, रूपेश मोंडकर तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. दामले यांनी, उपस्थित युवक, युवती, महिला, माजी सैनिक, अपंग, बचत गट सदस्य या सर्वांना नारळाच्या सोडणापासून काथ्या तयार करून त्यापासून दोरी तयार करणे, मॅटस तयार करणे, पायपुसणी तयार करणे, विविध शोभिवंत वस्तूंची निर्मिती करणे याबाबतच्या अनेक कुटीरउद्योगांची माहिती दिली. काथ्या उद्योग व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले. श्री. गावडे यांनी, काथ्या उद्योग व्यवसायामधील विविध उद्योग संधी, महाराष्ट्र कोकण विभाग काथ्या धोरण २०१८ बद्दलची माहिती, विविध काथ्या उत्पादनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे काथ्यावर आधारित कुटीरोद्योग कसा करावा याबाबतची माहिती तसेच विविध शासकीय कर्ज योजना व अनुदान याची माहिती दिली. सुत्रसंचालन येथील पंचायत समिती समुह समन्वयक विनायक धुरी यांनी केले. तर विजय मेस्त्री यांनी आभार मानले. दरम्यान, मोफत एक दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असणार्या पात्र युवक युवतींकरिता पुढे ३० दिवसांच्या मोफत ‘तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ आयोजन ग्रामपंचायत सभागृह बापर्डे येथे करण्यात येणार आहे.