अविचारांची विद्यार्थ्यांनी केली होळी

अविचारांची विद्यार्थ्यांनी केली होळी

अविचारांची विद्यार्थ्यांनी केली होळी
घाटकोपर ः मनातल्या अविचारांमुळे माणसाकडून वाईट कृत्‍य होतात. अशा अविचारांची होळी घाटकोपर पूर्वेतील ज्ञान मंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज (ता. ४) केली. होळी जाळून, बोंब ठोकून उत्सव साजरा करण्यापेक्षा आपल्या मनातील वाईट विचार या दिवशी आपण अंतकरणातून जाळून नव्या शुद्ध विचारांना मनात स्थान देत होळी साजरा करण्याचा मानस ज्ञान मंदिर हायस्कूलच्या इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी होळी उत्सवात व्‍यक्‍त केला. शाळेचे संस्थापक अनिल झोरे यांच्या संकल्पनेतून हा होळी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी राग, मद, मत्सर, चिंता, क्रोध, दंभ या विषयामुळे होणारे दुष्कृत्य कसे घडते, हे सादर केले. विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे हे विषय होळीत दहन केले. शाळेचे मुख्यध्यापक शैलेश जाधव, वर्गशिक्षिका भूमी कदम, स्वाती पवार, रोझ सालोमी, यज्ञेश कदम यांनी ही संकल्पना यशस्वी केली.
---
अदाणीतर्फे राष्‍ट्रीय लाईनमन दिन
मुंबई : अदाणी इलेक्ट्रिसिटीने राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करताना लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही लाईनमनचा यानिमित्ताने सत्कार केला. भूमिगत तसेच जमिनीवरील वीजवाहिनी आणि सहाय्यक उपकरणे, दुरुस्ती तसेच देखभाल करण्यासाठी लाईनमन सतत काम करतात. याव्यतिरिक्त ते भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी खंदक खोदतात, तसेच मीटर बसवतात. ओव्हरहेड लाईन दुरुस्तीसाठी प्रसंगी त्यांना खांबावर चढून वीजवाहिन्यांची तपासणी करावी लागते. लाईनमनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेशिवाय मुंबईकरांचा विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा अशक्य आहे. या भूमिकेतून चांगले काम करणाऱ्या लाईनमनचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंबईची भिस्त असलेले लाईनमन हे ऊर्जायोद्धे आहेत, अशा शब्दांत अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी त्यांचा गौरव केला.
--
फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण शिबिर
मुलुंड ः मुंबई-समता हॉकर्स युनियन संलग्न नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडियाच्या वतीने मुलुंड पश्चिम येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी ते समृद्धी या योजनेची माहिती देण्यात आली. तसेच संयोजक गुरुनानक सावंत यांनी उपजीविका आणि डिजिटल पेमेंटबद्दल माहिती दिली. तसेच समता हॉकर्स युनियनचे अध्‍यक्ष शरीफ खान यांनी स्ट्रीट व्हेंडर कायदा आणि फेरीवाले आणि ज्यांना अद्याप बँक कर्ज मिळालेले नाही, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त अशी माहिती दिली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (उत्तर भारतीय सेल) सरचिटणीस डॉ. सचिन सिंग, ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष उत्तम गीते, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते राजोल पाटील, राष्ट्रवादीचे तालुका मुलुंड अध्यक्ष ॲड. अमित पाटील उपस्थित होते.
--
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
शिवडी ः जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र बाजारपेठ परिवारातर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा गुरुवारी (ता. ९) माटुंगा पश्चिम येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला रॅम्पवॉक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामधून परीक्षक ‘महाराष्ट्र बाजारपेठ क्वीन’ची निवड करणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र बाजारपेठ अध्यक्ष कौतिक दांडगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६९९६८९७२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
--
रेल्वे सुरक्षा समितीची बैठक
वडाळा ः होळी, धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ३) सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधक कार्यालयात रेल्वे सुरक्षा समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन प्रबंधक विनायक शेवाळे, वडाळा लोहमार्ग पोलिस उप-निरीक्षक मंगेश विचारे व गोपनीय शाखेचे अंमलदार, पॉईंट्समन, सफाई कर्मचारी, बूटपॉलिश कामगार, कॅन्टीन मॅनेजर, कॅन्टीनवेंडर असे एकूण १२ सुरक्षा समिती सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com