
संक्षिप्त
जखमी रानमांजराच्या पिल्लाला जीवदान
दाभोळ : दापोली तालुक्यातील कुंभवे येथे वणवा विझवताना सुतार वाडी मधील ग्रमस्थ संदीप गावखडकर यांना जखमी अवस्थेमध्ये रानमांजराचे पिल्लु दिसले. त्यांनी त्याला आपल्या घरी नेले व तात्काळ सर्पमित्र मिलिंद गोरिवले यांना फोन करून कल्पना दिली. सर्पमित्र मिलिंद गोरिवले व तुषार महाडिक यांनी लगेच गावखडकर यांच्या घरी भेट दिली व रानमांजर ताब्यात घेऊन वनविभागाला माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पशु वैद्यकीय दवाखान्यात वनविभागाच्या मदतीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून ते पूर्ण बरे झाल्यावर त्याला वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
पन्हाळेकाजी ते लाठीमाळ रस्त्यासाठी २ कोटी ६१ लाख
दाभोळ : दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी ग्रामपंचायतीने विकासाच्या माध्यमातून जे-जे मागितले ते आमदार योगश कदम यांनी दिले आहे. पन्हाळेकाजी ते लाठीमाळ रस्ता सुधारणे व डांबरीकरण करणे या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ६१ लाख इतका भरघोस निधी बजेटमध्ये प्रधान्याने मंजूर करून घेतला आहे. पर्यटन योजनेंतर्गत होलेश्वरवाडी डांबरीकरण करणे ३० लाख, देवरानवाडी ते बोरवाडी साकव बांधणे या कामासाठी ७ लाख असा निधी या गावाच्या विकासासाठी आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने खेडोपाड्यातील विकास शक्य होत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांनी व्यक्त केले. ते पन्हाळेकाजी ते लाठीमाळ रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सौ.रोहीणी दळवी, माजी उपसभापती सौ.ममता शिंदे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------
फोटो : rat५p३९.jpgKOP२३L८७१५७
दापोली : जीवन जाधव यांचा सत्कार करताना पोलीस निरीक्षक विवेक आहिरे.
सेवानिवृत्तीनिमित्त जीवन जाधव यांचा सत्कार
दाभोळ : दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जीवन जाधव यांनी २९ वर्षे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांना निरोप देण्यात आला.जीवन जाधव यांनी प्रथम रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्यानंतर पोलीस मुख्यालय रत्नागिरी, दापोली, मंडणगड त्यानंतर महामार्ग ट्राफिक कशेडी आणि पुन्हा दापोली अशा विविध ठिकाणी सेवा केली. पोलीस दलामध्ये अत्यंत नम्र आणि मितभाषी म्हणून जीवन जाधव सुपरिचीत असून त्यांच्या निवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार दापोली पोलीस पोलीस ठाण्यात करण्यात आला. दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी उपनिरीक्षक निनाद कांबळे, यादव, चव्हाण, सर्व कर्मचारी उपस्थित होते. जीवन जाधव यांच्या विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांचा विशेष असा सन्मान केला. या सन्मानप्रसंगी जीवन जाधव यांच्या पत्नी आणि कन्या यादेखील उपस्थित होत्या. निवृत्ती नंतर कुटुंबियांसमवेत चिपळूण येथे कायम स्वरूपी वास्तव्याला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. जीवन जाधव यांना सर्व पोलीस दलाने पुढील उत्तम व दीर्घ आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
दापोलीत आंबा, काजू पीक धोक्यात
दाभोळ : गेले दोन महिने वारंवार बदलत्या हवामानामुळे हाताशी आलेले आंबा आणि काजू पीक धोक्यात आले असून त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण तसे मोठे होते. पाऊस उशिरापर्यंत पडला होता. सहाजिकच थंडीचे प्रमाण वाढेल असा सर्वांचाच कयास होता. मात्र तसे होताना दिसत नाही. थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि जोडीला वारंवार बदलते हवामान याचा मोठा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला आहे. मार्च महिना उजाडला तरीही आंबा आणि काजू पिकाचे अस्तित्व तुलनेने मोठे जाणवत नाही. प्रतिवर्षी दापोली तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिना अखेर दिसणारे आंब्याचे मोठे फळ दिसेनासे झाले आहे. काजू पिकाची हीच अवस्था आहे. निसर्गाचा हा लहरीपणा असाच सुरू राहिला तर मार्च महिन्याअखेरपर्यंत दोन्ही पिकाची काढणी होऊ शकणार नाही. बदलत्या हवामानामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी आलेल्या फळांना गळती लागली आहे. आता बदलत्या हवामानाचा फटका आंब्याला बसू लागल्यामुळे शेतकरी पूर्ण कोसळला आहे. ज्या शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था आंबा आणि काजू पिकावर अवलंबून आहे ते शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.