
केर, मोर्ले, पाळये, सोनावल, मेढेला तिलारीचे पाणी द्या
केर, मोर्ले, पाळये, सोनावल,
मेढेला तिलारीचे पाणी द्या
राजन तेली; जलसंपदा मंत्र्यांना साकडे
दोडामार्ग, ता. ५ ः केर, मोर्ले, पाळये, सोनावल, मेढे आदी गावांना तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाणी मिळावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केर, मोर्ले, पाळये, सोनावल, मेढे ही गावे धरणापासून साधारण सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत; मात्र, या गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. पडीक क्षेत्र शेतीखाली येण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. तिलारीनगर बोगद्यातून वाया जाणारे पाणी खराडी नदीला मिळते. हे पाणी अडविल्यास व लोखंडी पाईपद्वारे या पंचक्रोशीतील गावांना दिल्यास सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहेत. शिवाय नोकरीला शहराकडे जाणारे युवक गावात शेतीतून उत्पन्न घेऊन स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे या गावांना तिलारी धरणाचे पाणी देऊन संजीवनी मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तेली यांनी केली आहे.