करवाढ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन

करवाढ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन

87210
सावंतवाडी : केशवसुत कट्ट्यावर आयोजित एल्गार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

करवाढ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन

बबन साळगावकर ः सावंतवाडीत सर्वपक्षीय एल्गार परिषदेत इशारा

सावंतवाडी,ता. ५ : नगरपरिषदेने घरपट्टी पाणीपट्टीत केलेली दरवाढ मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. शहरात करवाढ मागे घेण्यासाठी प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा रविवारी केशवसुत कट्ट्यावर झालेल्या सर्वपक्षीय एल्गार परिषदेत बबन साळगावकर यांनी दिला, तर दरवाढीला स्थगिती देण्यासाठी भाषामंत्र्यांना आज मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावे लागले, ही एकीची ताकद आहे. या पत्रामुळे करवाढीमागची अदृश्य शक्ती जनतेसमोर आली, अशी टीकाही साळगावकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप राष्ट्रवादी काँग्रेस वंचित आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी, तसेच नागरिक उपस्थित होते. या परिषदेला शिवसेना शिंदे गट मात्र उपस्थित नव्हता. या परिषदेत करवाढीचा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच सात मार्चला घरपट्टी पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले, तर ९ मार्चला चौकाचौकांत घंटानाद आंदोलन करण्याचे ठरले. तसेच त्यानंतर शिमगोत्सव झाल्यानंतर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. या बैठकीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी जस्मिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर, ज्येष्ठ नेते बाळा गावडे, मनसेचे राजू कासकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, वंचित आघाडीचे महेश परुळेकर, रामदास जाधव, केदार म्हैसकर, अफरोज राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, नरेंद्र गवंडे, भाजपच्या मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.
ॲड. दिलीप नार्वेकर यांनी आंदोलन करण्यापूर्वी घरपट्टी, पाणीपट्टी वाढीबाबत जो काय निर्णय झाला, त्याबाबत अभ्यास करून करवाढ मागे घेण्यात पालिकेला भाग पाडू, असा इशारा दिला. राघवेंद्र नार्वेकर यांनीही करवाढ मागे घ्यावी लागेल, असे सांगितले. वसंत केसरकर म्हणाले, शासन जनतेला लुटण्यास बसले आहे. वेगवेगळे कर आकारून जनतेची लूट सुरू आहे. लोकप्रतिनिधींची बॉडी नसताना करवाढ केली, ही बाब अन्यायकारक आहे. डॉक्टर जयंत परुळेकर म्हणाले, ‘करवाढ अन्यायकारक आहे. आज महागाईने जनता होरपळली आहे. जनतेचा आवाज दाबला जात आहे. जनता आता रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहे. करवाढीविरोधात आता जन आंदोलन उभारू.’
--
जखम करायची, अन् औषधे द्यायची
यावेळी साळगावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री केसरकरांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘साळगावकर जेथे जेथे आंदोलन करतात तेथे तेथे भाषामंत्र्यांना दखल घ्यावीच लागते. घरपट्टी, पाणीपट्टीवाढी संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, त्यामुळे करवाढ चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. आपणच जखम द्यायची आणि त्यावर औषध द्यायचे, ही त्यांची नीती आहे; परंतु करवाढीसंदर्भात गप्प बसणार नाही. शहरात जोरदार आंदोलन उभारू आणि करवाढ मागे घ्यायला लावू, असा इशारा दिला.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com