
उद्योग चेतना साद घाली नारी मना
rat०७१२.txt
बातमी क्र..१२ (टुडे पान ३ )
(१ मार्च टुडे पान दोन)
धरू कास उद्योजकतेची ..............लोगो
rat७p१८.jpg ः
८७३३९
प्रसाद जोग
महिला दिन विशेष ....लोगो
आज ८ मार्च जागतिक महिलादिन. सर्व स्त्रियांसाठी आज नवसंकल्पाचा दिवस, नवचेतना घेऊन नव्या संकल्पना अंमलात आणण्याचा दिवस. अंतर्मनाला साद घालून नवनिर्धाराने उद्योजकतेच्या प्रवासासाठी स्वयंसिद्ध होत नव्या उमेदीने उद्योजकीय नारी मनाला साद घालण्याचा दिवस. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागृत होण्याचा दिवस. अनेक संस्था, अनेक व्यक्तिमत्व महिला सक्षमीकरणाचे व सबलीकरणाचे काम करत असतात. आपल्या देशी वाणातील, मातीतील श्रीमंती महिलांनी जाणून घेऊन उपलब्ध असणाऱ्या साधनस्त्रोतांतून स्वप्रेरणेने आत्मनिर्भर व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहित व प्रेरित करत असतात. विपरित परिस्थितीतसुद्धा महिलांनी विचलित न होता उद्योजकतेची कास धरावी म्हणून त्यांना निरंतर चेतना, प्रेरणा व दिशा देणाऱ्या चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनची यशस्वी देदिप्यमान कामगिरीची नोंद आजच्या लेखातून ...
प्रसाद जोग,चिपळूण
--
उद्योग चेतना साद घाली नारी मना
यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे आपण ऐकलेले आहे; पण स्वतः प्रेरित होऊन सामाजिक उद्योजकता वाढावी म्हणून समाजभान जपत प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहताना व प्रत्येकीला सहकार्य करताना माणदेशीच्या माध्यमातून दिसून येते. ग्रामीण भागातील महिलांमधील उद्यमता वाढावी म्हणून नारीशक्ती ओळखून सतत त्यांना प्रोत्साहित व प्रेरित करून त्यांच्या उद्यमितेला निरंतर विकसित करण्याचे काम माणदेशी संस्था करत आहे.
२०१८ मधील डावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चेतना सिन्हा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारत सरकारच्या नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित चेतनाताई महिला सक्षमीकरण व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांची जडणघडण यात प्रामुख्याने लक्ष देत आहेत. ग्रामीण भागातील गरीब, गरजू व इच्छुक महिलांसाठी माणदेशी रत्नागिरी जिल्ह्यात ७ वर्षांपासून कार्यरत आहे. म्हसवड येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून, रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यालय चिपळूण येथे आहे. संस्थेमार्फत कमी भांडवलावर चालणाऱ्या व्यवसायाचे परिपूर्ण प्रशिक्षण ग्रामीण भागातील गरजू महिलांना व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. यासाठी वयाची व शिक्षणाची अट नसते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ प्रमाणित चिपळूण येथे हे प्रशिक्षण केंद्र असून, या केंद्रात महिलांना कच्च्या मालासंदर्भात माहिती, उत्पादित वस्तूंची किंमत निश्चिती कशी करावी याची माहिती व बाजारपेठेची पूर्ण माहिती करून दिली जाते. एवढ्यावरच न थांबता विक्रीयोग्य वस्तूस आठवडा बाजार किंवा विक्री प्रदर्शने यामध्ये समाविष्ट करून घेतले जाते. दहा ते पंधरा महिलागटाने एकत्र आल्या व त्यांनी मागणी केल्यास त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येते. आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, डिजिटल लिटरसी प्रशिक्षण, ग्रामीण महिला उद्योजकांसाठी ''देशी एमबीए'' कोर्स, शेतीविषयक कार्यशाळा, व्यवसायवाढीचे प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग आणि ब्युटीपार्लर हे विविध प्रशिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील महिलांना शेतीकामामुळे शहरात येणे शक्य नाही त्या उद्योजकीय प्रशिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून माणदेशी उद्योगिनी फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्रही चालवते. त्यांची गाडी ग्रामीण भागात जाऊन उद्योजकीय जागृती करते.
चिपळूण व परिसरातील ग्रामीण भागातील गरजू इच्छुक मुली व महिलांसाठी आर्थिक साक्षरता व व्यवसाय प्रशिक्षण हे गावांमध्ये स्थानिक महिलांच्या वेळेनुसार अत्यल्प फीमध्ये तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनांतर्गत दिले जाते. प्रशिक्षणापासून व्यवसायवाढीपर्यंत सर्वतोपरी सहकार्य केले जाते. माणदेशी उद्योगिनी व्यवसाय प्रशिक्षणकेंद्र व फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यातून आत्मविश्वास वृद्धिंगत झालेल्या महिलांसाठी माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स त्यांच्या व्यवसायवाढीसाठी सहकार्य करते. यशस्वी उद्योजिका घडाव्यात म्हणून त्यांना चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासदत्व दिले जाते. यातून महिलांचे संघटन वाढीस लागते. महिलांना बँकिंगची ओळख होते. चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे परिचय कार्यशाळा, व्यावसायिक सहली घेतल्या जातात व विविध उद्योजकीय तज्ञांचे मार्गदर्शन उद्योगिनींना उपलब्ध करून दिले जाते. माणदेशी बँकिंग क्षेत्रामध्ये असून, महिलांना बँकिंगचेही महत्व चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे समजून दिले जाते. मार्केटिंग ही छोट्या उद्योजकांसमोरची समस्या महिला उद्योजकांनाही भेडसावत असते. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे मार्केटिंग लिंकेज वाढवण्याचे काम केले जाते. मार्केटिंगविषयक कार्यशाळा घेतल्या जाऊन त्यातून जाहिरात व ब्रँडिंगचे महत्व महिला उद्योजकांना समजावून दिले जाते. प्रत्येक महिलेने स्वतःला ओळखून आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योजकतेच्या क्षेत्रात यावे म्हणून माणदेशी फाउंडेशनच्या वनिता शिंदे व मुख्य प्रशासन अधिकारी वंदना भोसले, चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रकल्प समन्वयक, श्रद्धा रेडीज, शाखा समन्वयक भाग्यश्री सुर्वे आणि महिला कर्मचारीवृंद कायम कार्यरत असतात. माणदेशी फाऊंडेशनमधून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वतः चे छोटे-मोठे उद्योग सुरू करून उद्योजकतेची कास धरलेल्या महिला आज माणदेशीविषयी भरभरून बोलत असतात. जागतिक महिलादिनानिमित्त सर्व महिलांना उद्योजकीय प्रेरणा मिळावी या मन:पूर्वक शुभेच्छा!
ठळक व महत्वाचे
* सात वर्षात चिपळूण शाखेमार्फत जिल्ह्यातील ४४ हजाराहून जास्त महिलांना व्यवसाय प्रशिक्षण
* महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारे व्यासपीठ
* ग्रामीण महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करणारी संस्था
* महिलांचे स्वयंरोजगाराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांना सातत्याने उद्योगचेतना देणारी संस्था
*महिला उद्योजकता वाढीस लागल्याने महिला सक्षमीकरण हा उद्देश साध्य
(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
-