कुडाळात १७ ला ‘शिवगर्जना’ महानाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात १७ ला ‘शिवगर्जना’ महानाट्य
कुडाळात १७ ला ‘शिवगर्जना’ महानाट्य

कुडाळात १७ ला ‘शिवगर्जना’ महानाट्य

sakal_logo
By

87346
कुडाळ ः शिवगर्जना महानाट्याचे माहितीपत्रक दाखविताना विशाल परब, संजू परब, अशोक सावंत, दादा साईल, तेजस माने, स्वप्नील यादव आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात १७ ला ‘शिवगर्जना’ महानाट्य

भाजपचा पुढाकार; ८०० कलाकारांसह घोडे, उंट, हत्तींचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विशाल सेवा फाउंडेशन व जिल्हा भाजपच्या वतीने शिवछत्रपतींवर आधारीत आशिया खंडातील ‘शिवगर्जना’, या महानाट्य प्रयोगाचे मोफत आयोजन येथील नवीन एस.टी. बस आगार येथे १७ मार्चला सायंकाळी पाचला केले आहे. सुमारे ७०० ते ८०० कलाकारांचा संच असलेल्या या महानाटकात घोडे, उंट, हत्ती यांचा समावेश आहे, अशी माहिती विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक उद्योजक विशाल परब व सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महानाट्यात बाहेरील कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
भाजप व विशाल परब सेवा फाउंडेशनच्या वतीने माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत कुडाळ येथे ''शिवगर्जना'' हे महानाट्य होणार आहे. यासंदर्भात कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष परब, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, ओरोस मंडलचे अध्यक्ष दादा साईल, तेजस माने, शिवगर्जना या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव, श्री. पटेल, दिग्विजय कालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संजू परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवगर्जना हे महानाट्य पहिल्यांदाच होत आहे. या महानाट्यानिमित्त भाजपची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील जनतेसाठी ही एक पर्वणीच असणार आहे, असे सांगितले.
फाउंडेशनचे अध्यक्ष परब म्हणाले, ‘‘माजी खासदार नीलेश राणे हे कार्यकर्त्यांचे राजकीय गुरू आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक युवा चेहरे उजेडात आले. छत्रपतींची जीवनगाथा नवीन पिढीला ज्ञात व्हावी, हा या महानाट्यामागचा उद्देश आहे. या महानाट्यात बाहेरील कलाकारांसोबत स्थानिकांनाही कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे; मात्र दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड होणार आहे. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली दहा वर्षे सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी विविध उपक्रम दरवर्षी राबविले जाता. यावर्षी ‘शिवगर्जना’ हे महानाट्य असणार आहे. सुमारे ७०० ते ८०० कलाकारांचा संच असलेल्या या महानाट्यात घोडे, उंट, हत्ती यांचा समावेश दिसून येणार आहे. सुमारे ६० ते ७० हजार नागरिक या महानाट्याला उपस्थित राहतील, असा अंदाज असून तशा प्रकारे व्यवस्था केली आहे. हे महानाट्य विविध भाषांमध्ये आहे. जिल्ह्यात ते मराठीतून सादर होणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये या महानाट्याचे पास ठेवले जाणार आहेत. सर्व नागरिकांसाठी महानाट्य मोफत दाखविले जाणार आहे. या महानाट्याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह विविध नेते उपस्थित राहणार आहेत. आठही तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे.’’ दरम्यान, या महानाट्याचे लेखक इंद्रजित सावंत, निर्माती रेणू यादव आहेत. यावेळी महाराष्ट्रातील लोककला सादरीकरण होणार असून शिवराज्याभिषेकादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
--
महानाटकाचा ८१वा प्रयोग
दिग्दर्शक यादव म्हणाले, "हे महानाट्य विविध भाषांमध्ये असून हा ८१ वा प्रयोग सादर करणार आहोत. सर्व ठिकाणी प्रयोग करत असताना आयोजकांनी प्रवेश शुल्क आकारले होते; मात्र या ठिकाणी नागरिकांसाठी महानाट्य मोफत दाखविले जाणार आहे. महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. महानाट्याचे हिंदीतील प्रयोग दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. दोनशे फूट लांब व ६० फूट उंचीचा भव्य रंगमंच कुडाळात उभारण्यात येणार आहे.’’