
ओटवणेत शिमगोत्सवास सुरुवात
87362
ओटवणे ः होळी पूजनासाठी गाव चव्हाट्यावर ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
ओटवणेत शिमगोत्सवास सुरुवात
ओटवणे, ता. ७ ः येथे धार्मिक पारंपरिक प्रथेप्रमाणे गाव चव्हाट्यावर आंब्याची होळी उभारून काल (ता. ६) शिमगोत्सवाला सुरुवात झाली. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात काल सायंकाळी ढोल वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुमारे ४५ फूट उंचीची होळी उभारण्यात आली. यावर्षी करमळगाळू येथील विनायक देवधर यांच्या बागेतील झाडाची होळीसाठी निवड झाली.
ओटवणे येथील शिमगोत्सवात बाराबलुतेदारीचे उत्तम उदाहरण आजही त्याच परंपरेने पहायला मिळते. तिसऱ्या दिवशी हळदवणी कार्यक्रम साजरा केला जातो. या दिवसापासून रात्री रोबांटे गाव चव्हाट्यावर हजर होतात. धार्मिक प्रथेप्रमाणे तिसऱ्या दिवसापासून दैविक निशाण काठी प्रत्येकाच्या घरी पूजेसाठी नेली जाते. यावेळी मानकरी, दैविक सेवक उपस्थित असतात. ही रोबांटे चौथ्या आणि सहाव्या दिवशीही वाजतगाजत रात्री गाव चव्हाट्यावर येतात; मात्र पाचवा दिवस हा या उत्सवात कडकडीत बंद पाळला जातो. या दिवशी मूळ ओटवणे येथे असलेल्या सावंतवाडी राजेशाही संस्थानाचा रंगपंचमी कार्यक्रम असल्याने त्यावेळी पूर्ण गावाचा सोहळ्यात सहभाग असायचा. ती प्रथा आजही पाळली जाते. सातव्या दिवशी सायंकाळी धुळवडीने, तर रात्री उशिरा घोडेमोडणीने शिमगोत्सवाची सांगता होते.