केरसुणी व्यवसायातून रणरागिणींनी कुटुंबे सावरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरसुणी व्यवसायातून रणरागिणींनी कुटुंबे सावरली
केरसुणी व्यवसायातून रणरागिणींनी कुटुंबे सावरली

केरसुणी व्यवसायातून रणरागिणींनी कुटुंबे सावरली

sakal_logo
By

लोगो ः जागतिक महिलादिन विशेष
---
87425
श्री वेतोबा स्वयंसहाय्यता समुहाच्या महिला एकत्रितपणे केरसुणी तयार करण्याचे काम करतात.


केरसुणी व्यवसायातून रणरागिणींनी कुटुंबे सावरली

वेताळबांबर्डेतील यशोगाथा; एकजुटीच्या जोरावर महिलांनी घडवला बदल

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ ः संघटितपणाला उमेदची मिळालेली साथ, प्रचंड मेहनत, बाजारपेठेतील संधीची गरज ओळखून वेताळबांबर्डेतील वेतोबा महिला स्वंयसहाय्यता समुहाने गौण समजल्या जाणाऱ्या केरसुणी व्यवसायात गरुडझेप घेतली आहे. या व्यवसायातून अनेक कुटुंबे आर्थिक स्थिरस्थावर होऊन स्वावलंबी बनली आहेत. या समुहाचा क्रांतिकारक प्रवास जिल्ह्यातील इतर महिलांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
चूल आणि मुल, अशीच काहीशी अवस्था पूर्वी महिलांची होती; परंतु कालानुरूप परिस्थिती बदलली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत आहेत. बस चालक, वाहक ते वैमानिक अशा विविध क्षेत्रांत मोठ्या जबाबदाऱ्या महिला सांभाळत आहेत. शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला देखील स्वाभिमान, स्वालंबित्वाचा विचार करून पावले उचलताना दिसत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळबांबर्डे या गावातील महिला देखील पूर्वी इतर गावांतील महिलांप्रमाणे शेती आणि गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. गावातील ११ महिलांनी एकत्र येत श्री वेतोबा महिला स्वयंसमुहाची स्थापना केली. त्यांना ''उमेद''ची साथ मिळाली. त्यातून आता या बचतगटाने क्रांतिकारक प्रगती साधली आहे. या बचतगटाच्या माध्यमातून केरसुणी बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला. गोव्यात केरसुणीला मोठी मागणी आणि चांगला दर देखील मिळतो. तेथील बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन या व्यवसायात त्यांनी वाढ केली. घरातील दैंनदिन काम करता करता सहज एखाददुसरी झाडू बांधण्याचे काम या महिला करतात. केरसुणीकरिता लागणारी झावळे आजूबाजूच्या गावातील नारळ बागायतदारांकडून खरेदी करतात. त्यानंतर हीर काढणे, ते गुफंणे अशी कामे घरच्या घरी करतात. तयार केलेल्या झाडू गोव्यातील व्यापारी गावात येऊन खरेदी करतो. त्यामुळे उत्पादित मालाला बाजारपेठ नाही, असा प्रश्न देखील निर्माण होत नाही. केरसुणीची वर्गवारी केली जाते. मोठी झाडू २०० रुपये, मध्यम १५० रुपये आणि लहान झाडू १०० रुपयांना विक्री केली जाते. प्रत्येक महिला महिन्याला सरासरी ६० ते ७० झाडू तयार करते. त्यामुळे प्रत्येक महिला १० ते १२ हजार रुपये घरचे काम करीत मिळविते. आतापर्यंत बँकेत न गेलेल्या महिला आता बँकेचे आर्थिक व्यवहार देखील स्वतः करताना दिसत आहेत. या समुहातील अनेक महिला कुटुंबावर ओढवलेल्या संकटाचा सामना केरसुणी व्यवसायामुळे करू शकल्या. कुणी मनासारखे घर उभारले, कुणी मुलांना दर्जेदार शिक्षण दिले, तर कुणी पतीच्या आजारासाठी केरसुणी व्यवसायातील रक्कम खर्च करते. समुहाच्या माध्यमातून गावात स्वच्छता मोहीम, माती नाला बंधारे, प्लास्टिक बंदी, शिक्षणाविषयी जनजागृती, आरोग्य शिबिर, अंगणवाडीला पोषण आहार पुरविणे असे उपक्रम राबविले जातात.
................
कोट
माझ्या पतीचे निधन २००८ मध्ये झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. मी खासगीरित्या झाडू बांधणी करून विक्री करीत होते; परंतु बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता प्राप्त झाली. झाडू व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून मुलांना चांगले शिक्षण दिले. मुलीचे लग्न करून घरही बांधले आहे.
- सुमन चव्हाण, समूह सदस्य
---
माझ्या पतीला नऊ वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला. तेव्हापासून ते बेडवर आहेत. झाडू व्यवसायातून नऊ ते दहा हजार रुपये मिळविते. त्यातून कुटुंबाचा खर्च, पतीच्या औषध उपचाराचा खर्च करते. निव्वळ या व्यवसायामुळे मी तरले आहे.
- प्रमिला चव्हाण, समूह सदस्य, वेताळबांबर्डे
...............
समुहातील प्रत्येक महिला प्रामाणिकपणे काम करते. त्यामुळेच या व्यवसायात आम्ही जम बसवू शकलो. केरसुणी व्यवसायामुळे आज अनेक कुटुंबे उभी राहिली आहेत.
- रोहिणी चव्हाण, अध्यक्ष, वेतोबा समूह