सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट
सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट

सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट

sakal_logo
By

rat०७७.txt

बातमी क्र.. ७ ( पान २ मेन)

- rat७p११.jpg-
८७३१९
राजापूर ः खडखडाट झालेले सायबाचे धरण.

सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट

पाणीटंचाई वेळेआधीच ; गाळ साठल्याने डोकेदुखीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचा उष्मा वाढला असून, उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम होताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या कोदवली येथील सायबाच्या धरणामध्ये आतापासूनच खडखडाट झालेला आहे. त्यामुळे यावर्षी राजापूकरांना लवकरच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
कोदवली येथे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या धरणाद्वारे राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. नैसर्गिक दाबाने पाइपलाइनद्वारे धरणातून शहरातील साठवण टाक्यांमध्ये पाणी येऊन त्या ठिकाणी त्याचा साठा होतो. त्यानंतर शहरातील विविध भागामध्ये नगर पालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या सायबाच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला आहे. शहरातील कोदवली नदीपात्रातील गाळाचा सध्या लोकसहभागातून उपसा सुरू असून, येत्या काही दिवसांमध्ये सायबाच्या धरणाच्या येथीलही गाळाचा उपसा केला जाणार आहे.
दरम्यान, दरवर्षी साधारणपणे मार्च अखेर वा एप्रिलच्या सुरवातीला या ठिकाणी नदीचे पात्र शुष्क होण्यास सुरवात होते. यावर्षी फेब्रुवारीपासूनच अती तीव्र उन्हाळा सुरू झाल्याने कोदवली धरणातील पाणी आटू लागल्याचे दिसत आहे. सध्या स्थितीमध्ये सायबाच्या धरणामध्ये पाण्याअभावी खडखडाट झालेला आहे. त्यामुळे राजापूरकरांना यावर्षीही दरवर्षीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यामध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
---
गाळ उपशाचे काम घेतले जाणार

कोदवली येथील सायबाच्या धरणामध्ये पाणीसाठा होण्यात अडथळा ठरत असलेल्या गाळाच उपसा व्हावा, अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडलेले आहे. नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम सध्या शहरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सायबाच्या धरणामधीलही गाळ उपशाचे काम सुरू झाले होते. मात्र, गढूळ पाणी येत असल्याच्या लोकांच्या तक्रारीनंतर हे काम थांबवण्यात आले होते. सद्यःस्थितीमध्ये धरणातील पाणी आटल्याने येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा धरणातील गाळ उपशाचे काम घेतले जाण्याची शक्यता आहे.
--