चिपळूण ः वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर
चिपळूण ः वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर

चिपळूण ः वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर

sakal_logo
By

फोटो
- ratchl७४.jpg ःKOP२३L८७४१२
चिपळूण ः शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, डॉ. गौरी साने, लाईफकेअरचे डॉ. इसहाक खतीब व मान्यवर.

वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी
मॅमोग्राफी तपासणी शिबिर
मेडिकल असोसिएशन व ऑन्कोचा उपक्रम ः दहा मिनिटात होते तपासणी
चिपळूण, ता. ७ ः महिला दिनाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशन (चिपळूण) आणि ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील महिला डॉक्टर, परिचारिका आणि महिला कर्मचारी यांच्यासाठी मोफत कर्करोग तपासणीसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे वैद्यकीय शिबिर घेण्यात आले.
अलीकडे स्तनाच्या कर्करोगात वाढ होऊ लागली आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने आजार बळावतो. म्हणूनच स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन (चिपळूण) यांच्या सहकार्याने ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरने महिलांसाठी मेमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.
लाईफकेअर रुग्णालयाच्या डॉ. सायली माधव म्हणाल्या, ‘स्तनाच्या कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यावर उपचार करणं डॉक्टरांना सोपं होतं. स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी चाचणी केली जाते. ही चाचणी १० मिनिटामध्ये करण्यात येत असून, त्यात कोणताही त्रास होत नाही. या चाचणीद्वारे स्तनातील गाठ कर्करोगाची आहे की नाही याचं निदान करणं सोपं होतं. भारतात स्तनाच्या कर्करोगामुळे दर ३१ महिलांमागे एकीचा मृत्यू होत आहे. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. यात महिलांनी घरच्या घरी स्वतःच्या स्तनाची तपासणी करण गरजेचं आहे. स्तनात गाठ दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
या शिबिरासाठी डॉ. गौरी साने, डॉ. कंचन मदार यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनप्रसंगी लाईफकेअर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. इसहाक खतीब, जिल्हा बॅंकेच्या संचालिका दिशा दाभोलकर उपस्थित होत्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरच्या डॉ प्राची हरवंदे यांनी परिश्रम घेतले.

चौकट
वेळीच निदान व उपचार आवश्यक
३५ वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे; मात्र अनेकजणी पुरेशा माहिती अभावी ही चाचणी करून घेत नाहीत; पण वेळीच निदान व उपचार झाल्यास कर्करोगामुळे होणारी पुढील गुंतागुंता टाळता येऊ शकते. इतकंच नाही तर स्तनाच्या कर्करोगाचं वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते.