
पान दोन मेन-असलदेत चोरट्यांचा धुमाकूळ
पान दोन मेन
87458
असलदेत चोरट्यांचा धुमाकूळ
रात्रीत तीन ठिकाणी चोरी ः दोन मंदिरांसह शाळेलाही केले लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. 7 ः जिल्ह्यात गेले काही दिवस निवांत असलेले चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून असलदे येथील श्री देव रामेश्वर मंदिर, डामरेवाडीतील श्री साई मंदिराची दानपेटी आणि चव्हाटा येथील प्राथमिक शाळेतील तीन कपाटे फोडून चोरी केली. ही घटना रविवारी (ता. 5) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
असलदे गावचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर या नदीकाठी वसलेल्या मंदिरातील देवालयाची दानपेटी फोडून चोऱट्यांनी आतील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. त्यानंतर चव्हाटा येथील प्राथमिक शाळेतील तीन कपाटे फोडून आपला मोर्चा असलदे-डामरेवाडी येथील साईमंदिराकडे वळविला. तेथील दानपेटी हत्याराच्या साहाय्याने फोडून आतील रक्कम लंपास केली. रामेश्वर मंदिरातील नारळ फोडण्यासाठी ठेवलेला सुरा नेऊन दानपेटी फोडून झाल्यावर सुरा तिथेच टाकून पलायन केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेत आल्यानंतर दरवाजा, कपाटे फोडलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी शाळेच्या एका वर्ग खोलीत मद्यपान करून बाटली त्याच ठिकाणी टाकली. मंदिर व शाळांमध्ये चोरी झाल्याचे समजताच सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलिस पाटील सावित्री पाताडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, विजय डामरे, दयानंद हडकर, योगेश डामरे, अनिल नरे, महुल घाडी, श्यामू परब यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.