
चिपळूण ः अनंत गीतेंना लोकसभेची मुंबईतून उमेदवारी ?
PNE१८N७२३०६
अनंत गीतेना मुंबईतून
लोकसभेची उमेदवारी?
पुनर्वसनाची तयारी ;रायगडची जागा राष्ट्रवादीकडे
चिपळूण, ता. ७ ः माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेकडून मुंबईतून उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास गीते यांचे मुंबईतून पुनर्वसन करून त्यांना लोकसभेत पाठवण्याची तयारी सुरू आहे.
अनंत गीते हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यांचे कोकणात दौरे वाढत आहेत. त्यामुळे ते कुठून उभे राहणार याची निश्चिती अद्याप व्हायची आहे. त्यांना मुंबईतील एखाद्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण, मुंबईतील शिवसेनेतून निवडून आलेले दोन खासदार हे ठाकरेंपासून अलिप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन जागांपैकी एका जागेवर गीतेंना संधी मिळू शकते.
भाजपने कोकणात मिशन लोकसभा सुरू केले आहे. कोकणातून ''कमळ'' या चिन्हावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांना भाजपने मंगळवारी प्रवेश देत लोकसभा मतदार संघाची तयारी सुरू केली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात २०१९ पूर्वी शिवसेनेचे अनंत गीते हे तीनवेळा या मतदार संघातून विजयी झाले होते; मात्र २०१९ च्या निवडणुकीत गीते यांचा अनपेक्षित पराभव होत सुनील तटकरे हे २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता भाजपने या मतदार संघावर दावा सांगितला आहे. पेण विधानसभा मतदार संघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवींद्र पाटील यांनी २०१९ ला धैर्यशील पाटील यांचा पराभव केला होता. आता भाजपने या दोघांतील एकाला विधानसभेला आणि एकाला लोकसभेला अशा रणनीतिने रायगड लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. भाजपला शह देण्यासाठी राज्यात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे गीते यांचे मुंबईत पुनर्वसन करण्याबाबत शिवसेनेत विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
कोट
लोकसभा निवडणूक कुठून लढवावी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली नाही; मात्र आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी मतदार आतूर आहे. मतदारांच्या मनात ठाकरे कुटुंब आहे. कोकण आणि मुंबईतील मतदार शिवसेनेबरोबर कायम राहतील.
- अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री