
देवगडात पारंपरिकतेने शिमगोत्सवास प्रारंभ
८७५७०
देवगडात पारंपरिकतेने
शिमगोत्सवास प्रारंभ
देवगड ः तालुक्यात ठिकठिकाणी होळी उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. विविध ठिकाणी नेहमीच्या प्रथेप्रमाणे उत्सवाला सुरुवात झाली. उत्सवासाठी काही ठिकाणी चाकरमान्यांचेही आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साही वातावरण असल्याचे चित्र आहे. काल (ता. ६) होळी पौर्णिमेच्या रात्री गावागावात होळी उत्सवाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मंदिरासमोर नेहमीच्या ठरलेल्या जागी होळी उभी करण्यात आली आहे. होळी उत्सवाबरोबरच गावातील पारंपरिक मांडावरील कार्यक्रमांना सुरुवात झाली. शिमगोत्सवाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. उत्सवादरम्यान गावागावात ठरलेल्या प्रथेप्रमाणे देवतांचे निशाण घरोघरी फिरविण्यास आता सुरुवात होईल. गावाच्या मांडावर विविध कार्यक्रम सुरू होतील. जामसंडे येथील श्री दिर्बादेवी -रामेश्वर मंदिरासमोरही होळी उभी करण्यात आली असून उत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. होळी उत्सवामुळे सर्वत्र उत्साही वातावरण होते.
---
८७५६९
वेंगुर्लेत रंगपंचमी उत्साहात साजरी
वेंगुर्ले ः तालुक्यात कालपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. आज विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. काल सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत ज्या ठिकाणी घातली जाते, त्या ठिकाणी आणण्यात आली. तेथे पूजन करून गाऱ्हाणे करण्यात आले. शहरात काल रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले या ठिकाणी होळी घालण्यात आली. तर आज सकाळी कुबलवाडा तसेच सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा या ठिकाणी होळी घालण्यात आली. यात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.