वायंगणी-पाटवाडीत पूल खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायंगणी-पाटवाडीत पूल खचला
वायंगणी-पाटवाडीत पूल खचला

वायंगणी-पाटवाडीत पूल खचला

sakal_logo
By

87572
वायंगणी ः पाटवाडीतील पूर खचल्यामुळे ग्रामस्थांनी ठेकेदार, अभियंत्यांना धारेवर धरले.

वायंगणी-पाटवाडीत पूल खचला

नाल्यात खड्डा खणल्याने समस्या; ठेकेदार धारेवर

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ ः वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पाण्यासाठी पाटवाडी नाल्यात जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून तडे गेले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कंत्राटदार आणि ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना धारेवर धरत पुलाचे काम करून देण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी कंत्राटदारासह अभियंत्यांना रस्त्यावर रोखून धरले. अखेर पुलाच्या दुरुस्ती व बांधकामाच्या लेखी आश्वासनानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला.
वायंगणी गावात सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी कुणालाही न विचारता पाटवाडी येथील पुलालगत ४ मार्चला नाल्यात खड्डा खणला. त्यामुळे पुलाला धोका निर्माण होऊन पूल खचल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. याबाबत येथील ग्रामस्थ उमेश सावंत, रावजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य मालती जोशी, दत्तात्रय सावंत, संजय सावंत, गणेश धुळे, विलास सावंत आदी ग्रामस्थांनी काल साईट इंजिनिअर स्वप्नील पवार, कनिष्ठ अभियंता गणेश बागायतकर यांना घटनास्थळी बोलावून धोकादायक बनलेल्या पुलाचे बांधकाम करून देण्याची मागणी केली. याबाबत कनिष्ठ अभियंता बागायतकर यांनी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने त्याची जबाबदारी असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली. तर कंत्राटदार संपूर्ण दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करू लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांना रस्त्यावरच अडकवून ठेवत जोपर्यंत बांधकामाची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. आचरा पोलिसांतही फोन करून येथील ग्रामस्थ उमेश सावंत, पोलिस पाटील त्रिंबककर यांनी घटनेची माहिती दिली. सुमारे अडीच तास चाललेल्या या वादानंतर झोनल अभियंते लक्ष्मण सुर्वे यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अखेर कंत्राटदारासह वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयात जात लेखी आश्वासन लिहून घेतल्यावरच या प्रकरणावर पडदा पडला. त्यानुसार पाटवाडी ते भंडारवाडी या रस्त्यावर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे पाटवाडी पुलाचा भाग खचलेला आढळून आला. याबाबत अधिक पाहणी केल्यावर ४ मार्चला संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन केल्यामुळे नुकसान झाल्याचे दिसून आले. याबाबत संबंधितांना तत्काळ बोलावून घेण्यात आले. त्यावेळी झोनल इंजिनिअर लक्ष्मण सुर्वे, साईट इंजिनिअर स्वप्नील पवार, कनिष्ठ अभियंता गणेश बागायतकर उपस्थित होते.
--
कंत्राटदाराकडून दखल, पंचनामा
ग्रामस्थांनी खचलेल्या भागाची दुरुस्ती व बांधकाम करून देण्याची मागणी केली. या मागणीमध्ये खचलेल्या भागात आवश्यक तेथे काँक्रिट, चिऱ्याचे बांधकाम व सुमारे दीड फुटाचा भराव व डांबरीकरण करून देण्याचे तसेच वाहत्या पाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली. यानुसार कंत्राटदाराकडून ग्वाही दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. यावर संबंधित अभियंत्यांसोबत उपस्थित ग्रामस्थ तसेच वायंगणी उपसरपंच समृद्धी असोलकर यांच्या स्वाक्षरी आहेत.