जनरिती- भाती लोगो

जनरिती- भाती लोगो

rat०८१३.txt

(२३ फेब्रुवारी टुडे पान चार)
बातमी क्र..१३ (टुडे ३ साठी)

जनरिती- भाती लोगो

rat८p६.jpg ः
८७६२१
डॉ. विकास शंकर पाटील

कोकणातला वारकरी संप्रदाय

कोकणात विठ्ठल मंदिरांची संख्या अधिक नसली तरी येथे वारकरी संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते. कोकणनिर्मितीनंतर येथे शिव उपासना व ग्रामदैवतांची उपासना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. प्रारंभीच्या कालखंडात विठ्ठलभक्ती सुरू झाल्याचे दिसत नाही. तरीही तेराव्या शतकापासून वाढत गेलेला वारकरी संप्रदाय हळूहळू कोकणातही विस्तारात गेलेला दिसतो. कोकणातील अनेक रवळनाथाचे ध्यान विठ्ठलासारखे दिसते व तेथे एकादशीला उत्सवही होतो. यातून येथे रवळनाथाचे ठायी विठ्ठलभक्ती चिंतल्याचे दिसून येते. कोकणातील अनेक ग्रामदेवतांची नावे विठू महाकाली, विठ्ठलाई, विठ्ठलादेवी अशी विठ्ठल नामासी साधर्म्य दाखवणारी आहेत. संतांनी विठ्ठलाला माऊली असे संबोधले आहे. या संतांच्या संबोधनातूनच विठ्ठलाई हे विठ्ठलाचेच रूप असावे का, असा प्रश्नही अभ्यासकांना पडतो. वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ वगैरे तालुक्यात वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. ही मंडळी अडीअडचणीला विठ्ठलाला साकडे घालताना दिसतात. रत्नागिरी जिल्ह्यातही राजापूर, लांजा आदी तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात दिसतो. लांजा तालुक्यातील भांबेड येथून पायी दिंडी पंढरीला आजही जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही वैभववाडी परिसरातून अशी दिंडी पंढरीला जाते.

-

आषाढी कार्तिकी एकादशीला कोकणात अनेक मंदिरात उत्सव साजरा होताना दिसतो. विठ्ठलाला काही ठिकाणी कृष्णरूप मानून त्याची पूजा करताना भक्त दिसतात. वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवी बंदर येथे गोकुळाष्टमी इतर गावांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते येथील विठ्ठल रूक्माईच्या मंदिरात प्रतिवर्षी गणेशचतुर्थी दिवशी गणेशमूर्ती पुजली जाते. वर्षभर या मंदिरात गणपती आणि विठ्ठल रूक्माईचे मनोभावे पूजन केले जाते. गोकुळाष्टमीला विठ्ठल रूक्माई मंदिरात कीर्तनसोहळा रंगतो तर गावात परंपरेने गोकूळ पूजला जातो. गोकुळाष्टमी दिवशी गावातील गोकूळ आणि विठ्ठल रूक्माई मंदिरातील गणेशमूर्ती यांचे वाजतगाजत विसर्जन केले जाते. विठ्ठल रूक्माई मंदिरात गोपाळकाल्याच्या दिवशी कीर्तनाने विविध कार्यक्रमांना सुरवात होते. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा पारंपरिक पद्धतीने मनोरंजक कार्यक्रम होतो. भक्तीभावनेने सारे दह्यादुधात भिजून जातात असा हा केळुसचा विठ्ठल रूक्माई मंदिरातला दहिकाला भक्तांसाठी भाग्याचा क्षण ठरतो. सावंतवाडीतील विठ्ठलमंदिर खूप जुने असल्याचे सांगितले जाते. रत्नागिरीतील विठ्ठल रूक्माई मंदिर प्रसिद्ध आहे. गोपाळबोध मळगावकर महाराजांनी सावंतवाडी आणि मळगाव परिसरात विठ्ठलभक्तीची परंपरा निर्माण केली. महाराजांच्या आईला झालेला भगवंती साक्षात्कार त्यानंतर पंढरपूर क्षेत्री त्यांचे झालेले आगमन, तिथे संतसेवेत काढलेले दिवस त्यानंतर गुरू आदेशानुसार महाराजांचे मळगावला झालेले आगमन आणि मळगाव क्षेत्री सुरू केलेली विठ्ठल आराधना हे सारे वास्तव कथा कहाणीसारखेच वाटते. महाराजांनी आपल्या साधनेच्या बळावर भक्तांना अनेक संकटातून मुक्त केले.
सावंतवाडी संस्थानात अवर्षण आणि दुष्काळ सुरू झाल्यावर महाराजांनी पावसाला साद घालण्यासाठी कीर्तन सुरू केले. महाराजांच्या या कीर्तन सामर्थ्याने सारे वातावरण बदलून गेले. पांडुरंगाकडे प्रार्थना करताच पाऊस सुरू झाला आणि सावंतवाडी संस्थानावरली दुष्काळाची छाया दूर झाली. साऱ्या भक्तांना महाराजांचे सामर्थ्य कळून आले. पुढे आजगाव येथे कीर्तन चालू असताना घनदाट अंधारात मंदिरातील समया उजळून गेल्या आणि महाराजांच्या साधनेच्या बळावर तेथे लख्ख प्रकाश दिसू लागला. या साऱ्याचाच परिणाम भक्तगणावर दिसू लागला. त्यांची महाराजाकडली व विठ्ठलभक्तीची ओढ वाढली. महाराजांचे अस्तित्व आजही येथील मंदिरात जाणवते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. पूर्णदासबाबा उसपकर यांनीही विठ्ठलभक्ती येथे रूजवल्याचे दिसते. त्यांनी कीर्तन उपयोगी आख्याने, पदे, अष्टके, अभंग इत्यादींची रचना केली. उभादांडा येथे त्यांनी एकांतवासात अध्यात्मविद्या आत्मसात केली. त्यांच्या वर्धापकाली प्रत्यक्ष विठ्ठल रूक्मिणी १३ महिने वृद्ध माणसाचे रूप घेऊन त्यांच्याजवळ राहिल्याचे ऐकायला मिळते. असंख्य लोकांना त्यांनी विठ्ठलभक्तीस लावून जनउद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात केले. झोळंबेकर महाराजांनीही विठ्ठलभक्तीची परंपरा मोठ्या प्रमाणात पुढे नेल्याचे दिसते.
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी ही परंपरा पुढे चालवण्याचे दिसते. संत महंतांनी विठ्ठलभक्ती कोकणात मोठ्या प्रमाणात रूजवण्याचे चित्र आहे. यामुळे अलीकडच्या कालखंडात विठ्ठल रूक्माई मंदिरांची संख्या कोकणात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आषाढी-कार्तिकी एकादशींना कोकणात भजन, कीर्तन आणि उत्सव साजरा होताना दिसतो. अनेक विठ्ठल रूक्माई मंदिरात सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये पारायण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम केले जातात. त्यामुळे आज कोकणात मोठ्या प्रमाणात विठ्ठलभक्ती सुरू असल्याचे चित्र आहे. पंढरीची वारी जगभरात पोचली आहे तशीच ती कोकणातही अवतरते. येथीलच विठ्ठल मंदिरात आषाढी कार्तिकीला येणाऱ्या छोट्या-मोठ्या दिंड्याही कोकणात दिसतात. प्राचीन परंपरा नसूनही कोकणच्या मातीत विठ्ठलभक्तीची परंपरा रूजताना दिसते.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com