
सिंधुदुर्गात एसटीचा प्रवास खडतर
एसटीचा प्रवास जिल्ह्यात खडतर
भारमान केवळ ५३.१२ टक्के; रोजचे उत्पन्न २५ लाख
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः सिंधुदुर्ग राज्य परिवहन महामंडळ विभागात भारमानाची टक्केवारी सध्या घसरलेली आहे. केवळ ५३.१२ टक्के एवढे भारमान आहे. एक लाख ११ हजार किलोमीटर एवढा प्रवास एका दिवसात या विभागातील एसटी करीत आहे. तर २५ लाख दररोज उत्पन्न मिळत आहे. १ लाख ३ हजार एवढ्या प्रवाशांची दररोज वाहतूक केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ १ जून २०२३ ला ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गत ७४ वर्षांच्या कालावधीमध्ये महामंडळाने प्रवाशांना किफायतशीर, सुरक्षित व नियमित बससेवा दिलेली आहे. यामुळेही महामंडळ प्रयत्नशील राहणार आहे. ‘रस्ता तेथे एसटी’ या ब्रीद वाक्याप्रमाणे जास्तीत जास्त खेड्यांना प्रवाशी सोय उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ सातत्याने प्रयत्न करीत आहे. महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च स्थान देत आहे.
सिंधुदुर्ग विभागात एसटी महामंडळाचे सात आगार आहेत. एक विभागीय कार्यशाळा आणि कणकवली येथे एक विभागीय कार्यशाळा आहे. त्यामध्ये सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, मालवण, देवगड व विजयदुर्ग अशी सात आगारे आहेत. कणकवली येथे विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा कार्यान्वित आहे. वाहतुकीसाठी ३९४ गाड्या असून १५ बसस्थानके व ६५ मार्ग शेड आहेत. ४२३ एवढ्या गाड्या आहेत. यात ११ शिवशाही, ४ निमआराम, २ स्लीपर कम सिटर बस, ३७७ साध्या गाड्या, २९ ट्रक अशा गाड्यांचा समावेश आहे. २ हजार ३६५ कर्मचारी संख्या आहे. सिंधुदुर्ग हा खेड्यापाड्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना प्रवासासाठी एसटी सुखकर व सोईस्कर वाटते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जिल्ह्यातील संख्या लक्षवेधी होती; मात्र कोरोना काळात वाहतूक बंद राहिली. प्रवाशी एसटीतून प्रवास करू शकत नव्हते. त्यानंतर एसटी कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिले. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली. त्यानंतर एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या; मात्र प्रवाशांनी कोरोना येण्यापूर्वीच्या तुलनेत मोठ्या संख्येने एसटी प्रवासाकडे पाठ फिरविली. त्यामुळे नियमितचे भारमान ५३ टक्केच्या आसपास राहिले आहे.
..............
चौकट
चालक, वाहकांची ३३३ पदे रिक्त
जिल्ह्यात ८९२ चालक तर ८७४ वाहक पदे मंजूर आहेत. यातील ५११ चालक आणि ४३८ वाहक पदे नियुक्त केलेली आहेत. त्यामुळे ३८१ चालक, तर ४३६ वाहक पदे रिक्त आहेत; मात्र चालक तथा वाहक ही पदे जिल्ह्याला मंजूर नाहीत. तरीही ४७४ एवढी पदे भरलेली आहेत. त्यामुळे २ हजार ८३३ पैकी २ हजार ६८ पदे भरली असून ७६५ पदे रिक्त आहेत.
.............
चौकट
प्रशासकीय यंत्रणेवरही ताण
प्रशासन विभागातील ३४९ पैकी २०० पदे भरली असून १४९ पदे रिक्त आहेत. यात १९ अधिकारी पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षक २९ पैकी १९ रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिक ३३ पैकी ९, टंकलेखक १५५ पैकी १९, टंक कारकून सर्व ११ पदे रिक्त आहेत. इतर १०२ पदांपैकी ७८ पदे रिक्त, कार्यशाळा विभागातील पर्यवेक्षकची ११ पैकी ८, प्रमुख कारागीरच्या २६ पैकी ४, कारागीर ‘क’च्या १२९ पदांपैकी ४३, सहाय्यक कारागीरच्या १६७ पैकी ४८, सहाय्यकच्या २२५ पैकी १२१, इतर पदांपैकी ३४ पैकी १६ अशी पदे रिक्त आहेत. एकूण ५९२ पैकी ३५२ पदे भरलेली असून २४० पदे रिक्त आहेत.
..............
चौकट
स्थिती सुधारण्याची अधिकाऱ्यांना अपेक्षा
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची सभा १७ फेब्रुवारीला जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात झाली. यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांनी आपला आढावा देताना जिल्ह्यात सध्या ५३.१२ टक्के एवढे भारमान मिळत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एसटी फेरी सुरू करून प्रवाशांना सुखकर व सोईस्कर प्रवास घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
--
चौकट
अधिकाऱ्यांची पदेही रिक्त
वाहतूक विभागातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक ७ पैकी ३, वाहतूक निरीक्षकच्या १६ पैकी ११, सहाय्यक वाहतूक निरीक्षक १७ पैकी ४, वाहतूक नियंत्रक ८६ पैकी २५ अशी पदे या विभागात रिक्त आहेत. एकूण १२६ पैकी ८३ पदे भरलेली असून ४३ पदे रिक्त आहेत.