
महिलांनी आरोग्यही जपणे महत्त्वाचे
87702
सिंधुदुर्गनगरी ः येथे महिलादिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा धर्मादाय आयुक्त एस. एम. निकम, दीपक म्हालटकर, विद्या शिरस.
महिलांनी आरोग्यही जपणे महत्त्वाचे
एस. एम. निकम; सिंधुदुर्गनगरीत महिलादिन उत्साहात
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः देश, राज्य आणि राज्याच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. महिला सक्षम असल्या तरच देशाची प्रगती झपाट्याने होणार आहे. त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करावे. आपल्या कर्तव्यांबरोबरच आरोग्यही जपा, असे प्रतिपादन जिल्हा धर्मादाय आयुक्त श्रीमती एस. एम. निकम यांनी आज महिला दिन कार्यक्रमात केले.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील नियोजन समिती सभागृहात महिलादिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा धर्मादाय आयुक्त निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक म्हालटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा माधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, मार्गदर्शक निकिता म्हापणकर, सरकारी वकील वेदिका राऊळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ थोर महिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय आरोग्य पथकामार्फत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुने घेऊन २७ प्रकारच्या तपासण्या यावेळी झाल्या.
---
महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
कणकवली येथील निकिता म्हापणकर यांनी समान वेतन कायदा, कारखाना कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, प्रसूती सुविधा कायदा, गर्भपाताबाबतचा कायदा या विषयांवर मार्गदर्शन केले. वेदिका राऊळ यांनी कौटुंबिक कायदे, फौजदारी कायदे याविषयी मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त जिल्हा धर्मादाय आयुक्त निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव म्हालटकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.