गुहागर ः नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

गुहागर ः नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

rat८p४.jpg-
87705
गुहागरः भाजप जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांना दुर्गादेवीची प्रतिमा भेट देताना किरण खरे, संगम मोरे, उमेश भोसले आणि अतुल फडके व संतोष मावळंकर.
-------------
नगराध्यक्षांच्या जागेवरचे
आरक्षण रद्द कसे झाले
केदार साठे ; सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा

गुहागर नगरपंचायत--लोगो

गुहागर, ता. ८ ः निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते; मात्र नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते हे गुहागरवासीयांनी समजून घ्यावे. या सदोष आराखड्यात बदल होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती घ्याव्यात. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी गुहागरमध्ये केले. ते विकास आराखड्यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.
शिमग्याचे होम लागून गेल्यावर आता गुहागरमध्ये विकास आराखड्यासंदर्भात शिमगा सुरू झाला आहे. आजपर्यंत वाडीवाडीत, नाक्यावर विकास आराखड्याबाबत चर्चा सुरू होत्या; मात्र कोणत्याच राजकीय पक्षाने एक निश्चित भूमिका बजावली नव्हती. आज प्रथमच भाजपने विकास आराखड्याबाबत भूमिका मांडली.
गुहागर वरचापाट येथील दुर्गादेवी मंदिरासमोरील सभागृहात शहर भाजपची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे उपस्थित होते. त्यांनी विकास आराखड्याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर मार्गदर्शन करताना साठे म्हणाले, गुहागरचा विकास आराखडा सदोष आहे. गुहागरची भौगोलिक रचना, पूर्वापार असलेली लोकवस्ती आदी अनेक बाबींचा विचार या आराखड्यात नाही. ५०० हून अधिक घरे बाधित होत आहेत. वास्तविक गुहागर नगरपंचायतीची स्थापना २०१२ मध्ये झाली तर मग विकास आराखडा येण्यासाठी २०२३ का उजाडले? जानेवारी महिन्यात नगरपंचायतीकडे आलेल्या आराखड्यात नगराध्यक्षांच्या जागेवरही आरक्षण होते; मात्र प्रसिद्ध झालेल्या आराखड्यात हे आरक्षण उठलेले दिसते. त्याचवेळी निवडक लोकप्रतिनिधी आणि सामान्यांच्या घर, जमिनीवर आरक्षणे आहेत याचाही विचार प्रत्येक गुहागरवासीयाने करणे आवश्यक आहे. या सदोष आराखड्यावर जास्तीत जास्त हरकती येणे आवश्यक आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या हरकती येण्यासाठी प्रयत्न करावेत, नागरिकांना मदत करावी.
या आराखड्याची दखल भाजपने घेतली आहे. सर्वसामान्य जनतेच्या घरादारावर वरवंटा फिरवणाऱ्या या आराखड्याबाबत पुर्नविचार होऊ शकतो यावर सर्वांनी विश्वास ठेवावा. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही; मात्र शासनाच्या व्यवस्थेप्रमाणे हरकती घेण्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असे आवाहन साठे यांनी केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष संगम मोरे, सामाजिक माध्यमांचे जिल्हा समन्वयक शार्दुल भावे, गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक गजानन वेल्हाळ, अरूण रहाटे, समीर घाणेकर, मृणाल गोयथळे, भाग्यलक्ष्मी कानडे, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, दुर्गादेवी देवस्थानचे विश्वस्त संतोष मावळंकर, अतुल फडके आदी उपस्थित होते.

चौकट
१४ मार्चला आराखड्याबाबत भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालक रवींद्र चव्हाण या सर्वांना गुहागरच्या विकास आराखड्यात कोणी काय केले आहे याची इत्थंभूत माहिती आहे. भाजप या विकास आराखड्याबाबत गंभीर आहे. १४ मार्चला विकास आराखड्याबाबत भेट ठरली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या विकास आराखड्याचा प्रश्न उपस्थित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com