
महिला खंबीर तर अपप्रवृत्तींना आळा
87731
सिंधुदुर्गनगरी ः महिलादिन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना विनायक ठाकूर. शेजारी डॉ. वसुधा मोरे, अपर्णा कुळकर्णी आदी.
महिला खंबीर तर अपप्रवृत्तींना आळा
विनायक ठाकूर; सिंधुदुर्गनगरीत महिला दिनानिमित्त कार्यशाळा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी कणखर राहावे. समाजातील महिला खंबीर झाल्यास समाजात घडणाऱ्या अपप्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल, असा विश्वास पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी आज महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला व किशोरवयीन मुलींची कार्यशाळा येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी संत गाडगेबाबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. वसुधा मोरे, अपर्णा कुळकर्णी, जिल्हा परिषद महिला कर्मचारी, किशोरवयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी आज आपण जागतिक महिलादिन साजरा करत आहोत. खरं तर स्त्री ही सर्वच क्षेत्रातील निर्मितीचे केंद्र आहे. त्यामुळे महिलांनी मी महिला आहे, तो पुरुष आहे, त्यांची कामे आपल्याला जमणार नाहीत, असे मानून मनातून खचून न जाता आता कणखर व्हावे, असे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित कार्यशाळेत डॉ. वसुधा मोरे यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन, महिलांचे आजार आणि योगा यावर, लातूर येथील अपर्णा कुळकर्णी यांनी महिलांच्या जबाबदाऱ्या व त्यांची कर्तव्ये यावर मार्गदर्शन केले.