
संक्षिप्त
पान ५ साठी, संक्षिप्त
चिपळुणात १४, १५ ला नाट्यरंग
चिपळूण ः चिपळूणच्या वतीने नाट्यचळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या नाटक कंपनीचे आयोजन केले आहे. १४ व १५ मार्च असे दोन दिवस पाहता येणार आहे. या दोन दिवसात संगीत मल्लिका व चित्रकथी अशा दोन सुंदर नाट्यकृती रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. नाट्य कंपनी नवीन पिढीमध्ये नाट्यकलागुण वाढीला लागावेत म्हणून ही संस्था गेली काही वर्षे प्रयत्न करत आहे. हाऊसफुल्ल या नावाने सलग तीन वर्षे एकांकिका, प्रहसने यांना संधी दिली गेली आहे. बाल बाल देखो बालनाट्य, हास्य तराना असे अनेक उपक्रम संस्थेने राबवले आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमातून नाट्य चळवळ पुढे नेत असताना सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नाट्यसंस्था सामाजिक कार्यालयातही सरसावली आहे. कोविड काळात काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी अशा ८ विभागांना एकत्र आणून कोविड फायटर क्रिकेट लिग आयोजित केली होती. सर्व कोविडयोद्धे यांचा सन्मान करणे हा त्यामागचा हेतू होता. एम. डी. कॉलेज, मुंबईचे चित्रकथी तसेच रत्नागिरीतील वरवडे-खंडाळा येथील कलारंग नाट्य प्रतिष्ठानचे संगीत मल्लिका अशा दोन उत्तम नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत ही नाटके रसिकांना श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या रंगमंचावर पाहता येईल.
श्रीरामवरदायिनी देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
खेड ः तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत नागेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या श्री रामवरदायिनी देवीचा प्राणप्रतिष्ठा व नवग्रहयुक्त नवचंडी हवन सोहळा १५ व १६ मार्च या कालावधीत होणार आहे. या निमित्त विविधांगी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १५ ला देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मात्रकापूजन, देवनांदी, मधुपर्क आचार्यवरण, मणिकशुद्धी, देवी सप्तशती पाठप्रारंभ, नवग्रह स्थापनपूजा, देवी आवाहन, आरती, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू, जुन्या मूर्तीची कलासंकोच, नव्या मूर्तीला अधिवास, सायंकाळी ७ वा. आजी-माजी सैनिकांचा सत्कार झाल्यानंतर महाप्रसाद व रात्री १० वा. हरिजागर भजन होईल. १६ ला गणेशपूजन, पुण्याहवाचन, स्थलशुद्धी, आवाहित देवता पूजा, नवमूर्तीची चर प्राणप्रतिष्ठा, नवग्रह, नवचंडी हवन, श्रीरामवरदायिनी देवी पूजा, पंचामृत अभिषेक शहाळे अभिषेक, कुंकूम अर्चना, पुष्पालंकार, आरती, कुमारीपूजन, सुवासिनी पूजन, यज्ञाची पूर्णाहुती, आवाहित देवता उत्तरपूजा, श्रीरामवरदायिनी देवी आरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद होईल.
खोंडेतील वणव्याने शेतकऱ्याचे नुकसान
खेड ः तालुक्यातील खोंडे येथील आयसीएस महाविद्यालयालगत लागलेल्या वणव्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लागलेला वणवा नगर पालिकेच्या अग्निशमक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर विझवल्याने नजीकच असलेले घर वाचवण्यात यश आले. खोंडे येथे वणवा लागल्याचे समजताच ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. याबाबत अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर अग्निशमन दलाचे फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, नीतेश भालेकर घटनास्थळी पोहोचले व अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणला.
आंबेशेतमध्ये पालखी नृत्य स्पर्धा
रत्नागिरी ः रत्नागिरीतील आंबेशेत घोसाळेवाडी येथे शिमगोत्सवानिमित्त ११ मार्चला पालखी नृत्य स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये उत्कृष्ट पालखी नृत्य करणाऱ्याला २१ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावची ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडली आहे. या निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेशेत येथील घोसाळेवाडी येथे देखील मागील अनेक वर्षे शिमगोत्सवात पालखी नृत्य उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा जोपासली गेली आहे. या वर्षी ११ मार्चला हा पालखी नृत्य उत्सव शिवशक्ती मित्रमंडळ रत्नागिरी आंबेशेत घोसाळेवाडी यांच्याकडून आयोजिला आहे. स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. पालखी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अनिल घोसाळे, शेखर घोसाळे, अमोल घोसाळे, अमित घोसाळे, आशिष घोसाळ, प्रियेश झापडेकर, शैलेश झापडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.