
‘न्यू खुशबू’च्या माहितीपटाने मारली बाजी
87768
मुंबई : येथील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ‘न्यू खुशबू’ महिला बचतगटाच्या तन्वीर शिरगावकर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले.
‘न्यू खुशबू’च्या माहितीपटाने मारली बाजी
राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम; मुंबईत तीन लाखांचे बक्षीस
कणकवली, ता.८ : कलमठ येथील उद्योजिका तन्वीर मुदस्सरनझर शिरगावकर यांच्या न्यू खुशबू स्वयंसहायता महिला समूहाच्या माहितीपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते तन्वीर यांचा गौरव करण्यात आला. तीन लाख रूपये, असे प्रथम क्रमांक पुरस्काराचे स्वरूप आहे.
महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी उद्योजिका तन्वीर शिरगावकर कार्यरत आहेत. मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. तन्वीर शिरगावकर यांनी २०१४-१५ साली घरगुती मसाला उद्योग सुरू केला. त्यानंतर २०१६-१७ साली कलमठ भागातील महिलांना एकत्र करत केवळ १५ हजारांच्या गुंतवणुकीतून न्यू खुशबू महिला स्वयंसहायता समूह स्थापन केला आणि आज या समूहाच्या माध्यमातून त्या लाखोंचा व्यवसाय करत आहेत. या बाबतची माहिती त्यांनी लघुपटाच्या माध्यमातून मांडली होती. या लघुपटाला राज्यात प्रथम क्रमाक मिळाला आहे. दरम्यान, न्यू खुशबू महिला समूहाच्या महितीपटाला जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असल्याचे मानले जात आहे.