वादळी वाऱ्याने कोट्यवधीची हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी वाऱ्याने कोट्यवधीची हानी
वादळी वाऱ्याने कोट्यवधीची हानी

वादळी वाऱ्याने कोट्यवधीची हानी

sakal_logo
By

87797
वैभववाडी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे गळून पडलेली काजूची कोवळी बी.

वादळी वाऱ्याने कोट्यवधीची हानी
---
आंबा, काजूवर संक्रांत; महिन्यातील सलग तिसरी घटना
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले. हाता-तोंडाशी आलेला आंबा, काजू बागायतदारांचा घास या वाऱ्याने हिरावून घेतला. महिनाभरात झालेल्या तीन वादळी वाऱ्यांमुळे आंबा, काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, अद्यापही कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
जिल्ह्याच्या वातावरणात काल (ता. ७) पहाटेपासून अचानक बदल झाला. पहाटे तीनपासून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काल सकाळी दहापर्यंत सोसाट्याचे वारे वाहत होते. त्यानंतर वाऱ्याची गती कमी झाली. काल मध्यरात्री दोनपासूनच जिल्ह्यात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या वाऱ्याने हिरावून घेतला. कोवळी काजू बी तर मोठ्या प्रमाणात गळून पडली. काही ठिकाणी काजू झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. काजूच्या झाडांखाली कोवळ्या काजू बीचा खच पडल्याचे चित्र अनेक बागांमधून पाहावयास मिळाले. काजू बागायतदारांचे वाऱ्याने नुकसान होण्याची महिनाभरातील तिसरी घटना आहे. त्यामुळे बागायतदार मेटाकुटीस आला आहे. काजू पीक सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. एकीकडे काजूचा हंगाम सुरू असताना दुसरीकडे मागाहून पडलेल्या थंडीमुळे नव्याने मोहोर आला होता. ती फळे परिपक्व होण्याच्या स्थितीत होती. तीच गळून पडल्याने बागायतदार निराश झाला आहे. आंब्याची अवस्थाही याहून वेगळी नाही. आंबा हंगाम चार-पाच दिवसांपासून सुरू असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा बागायतदारांचीही चिंता वाढली आहे. आंब्याची गोटी आकाराची फळेही काही ठिकाणी पडल्याचे दिसून आले.

- कोट
वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळे गळून पडली असतील, तर बागायतदारांनी ती तत्काळ उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यामुळे फळमाशींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. याशिवाय, तापमान वाढही झालेली आहे. त्यामुळे ज्या आंबा बागायतदारांना शक्य आहे, त्यांनी सकाळी लवकर किंवा सायंकाळी झाडांना पाणी द्यावे. त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, फळसंशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

- कोट
वादळी वाऱ्याने काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. महिनाभरात तिसऱ्यांदा काजू पिकांचे नुकसान झाले असून, बागायतदार हतबल झाला आहे. काजू नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत.
- मंगेश गुरव, काजू बागायतदार, खंबाळे