
प्रथम ग्रामपंचायत द्या, नंतरच विकास कामे करा
प्रथम ग्रामपंचायत द्या,
नंतरच विकासकामे करा
कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
कणकवली, ता. ९ : पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकासकामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे. अलीकडेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळयोजना चुकीच्या पद्धतीने व बाहेरील गावातील व्यक्तींकडून राजकीय स्वार्थासाठी राबविली जात असल्याने गावात गटतट निर्माण झाले आहेत. यामुळे गावातील सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याची भीती आहे. गावाला सद्य स्थितीत जुन्या योजनेवरून मुबलक व मोफत पाणीपुरवठा होत असल्याने आम्हाला गावात भांडणे निर्माण करणारी नळयोजना नको. शासन व लोक प्रतिनिधींनी सर्व प्रथम आम्हाला हक्काची ग्रामपंचायत द्यावी. नंतर आम्ही विकास कामे सुचवू असे श्री. पिळणकर यांनी सांगितले.
श्री. पिळणकर म्हणाले, ‘‘नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून गेली बारा वर्षे आपण येथील समस्या सोडविण्यासाठी काम करत आहे. मात्र, अलीकडे लगतच्या लोरे गावातील पिता-पुत्र पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वसाहतीत वाढला आहे. आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार नाही. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. वसाहतीतील २७५ पैकी ७५ घरे लोरे ग्रामपंचायतीला परस्पर जोडली आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने आम्हाला हे रितसर भूखंड दिले आहेत. या मागे कोणाची मेहरबानी नाही. आमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त सक्षम आहोत. मात्र कुणी बाहेरच्या गावातील व्यक्ती आमच्यात गटतट निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. पिळणकर यांनी दिला. जलजीवनमधून आमच्या गावठणासाठी मंजूर ४६ लाखांची नळ योजना राबविताना अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. या योजनेची विहीर लोरे गांधीवाडीत असून या योजनेवरूनच गांधीवाडीला पाणी पुरवठा करण्याचा काही जणांचा हेतू आहे. मुळात नवीन कुर्ली वसाहतीला गेली १२ वर्षे नियमित मुबलक व मोफत पाणीपुरवठा होत असून आम्हाला पर्यायी नळयोजनेची आवश्यकता नाही. प्रशासनाने नव्याने प्रस्तावित नळयोजना रद्द करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.