
आत्मविश्वासातून संधीचे सोने करा
swt910.jpg
87883
रानबांबुळी : उन्नती महिला मंडळ आयोजित महिला दिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना रिया आळवेकर. सोबत प्राप्ती चिंदरकर, अध्यक्षा दीक्षा ठाकूर व अन्य.
आत्मविश्वासातून संधीचे सोने करा
रिया आळवेकरः रानबांबुळीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः जिजाऊमुळे शिवबा, सीतेमुळे राम, राधेमुळे शाम अशा अनेक संस्कारांतून महिला जात असतात. आज जागतिक महिलादिन हा महिलांचा हक्काचा दिवस आहे. या उपक्रमातून प्रत्येक महिलेने ताकद दाखवत अनेक गुण आत्मसात करून संधीचे सोने करावे. मी आज देशात पहिली तृतीयपंथी महिला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या काळात बाळगलेली जिद्द आणि ताकद यातूनच हा बहूमान मला प्राप्त झाला, असे उद्गार रिया आळवेकर यांनी काढले.
रानबांबुळी (ता. कुडाळ) येथे उन्नती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तृतीयपंथी प्रथम शिक्षिका आळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष दिक्षा ठाकूर, उपाध्यक्ष अंजली कदम, सचिव डॉ. वैदेही आईर, खजिनदार जान्हवी सावंत, अस्मिता साईल, साक्षी गोसावी आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य, सरपंच परशुराम परब, उपसरपंच सुहास बांबुळकर, माजी सरपंच वसंत बांबुळकर, सतीश परब, बबन परब, अशोक परब आदींसह गावातील व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्राप्ती चिंदरकर, तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर आणि राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त पूर्वा गावडे आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यकम पार पडले. यामध्ये गावातील बचतगट, महिला गट यांनी विविधसांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक आळवेकर म्हणाल्या, ‘‘एखादी स्त्री आई होऊ शकली नसती तर जिजाऊचा शिवबा, राधेचा श्याम, सीतेचा राम होऊ शकला नसता. आज महिलांना अनेक संस्कारांतून जावे लागत आहे. आजचा जागतिक महिला दिन हक्काचा दिवस आहे. त्यानिमित्त आयोजित केलेला हा महिला मेळावा आणि सत्कार कार्यक्रम स्तुत्य आहे. एक तृतीयपंथी शिक्षिका म्हणून समाजात येत असताना अनेक अडीअडचणींतून जावे लागले. या प्रवासात न डगमगता शिक्षणातून जिल्ह्यात पहिली तृतीयपंथी शिक्षिका म्हणून वाटचाल करत आहे. रानबांबुळी गावाने केलेला सन्मान कधीही विसरू शकत नाही.’’
अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त चिंदरकर म्हणाल्या, ‘‘रानबांबुळी ही माझी जन्मभूमी आहे. आज माझा आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाल्याबाबत आपण केलेला सन्मान हा प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फलित आहे. आज महिला चूल आणि मुल एवढी मर्यादित न राहता देशाच्या राष्ट्रपती व विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. प्रत्येक महिलेने कलागुण आत्मसात करून संधीचे सोने केले पाहिजे. ''नारी तू घे भरारी, पाहू नको माघारी'' या उक्तीप्रमाणे कार्य केले पाहिजे.’’