पक्क्या घराचे स्वप्न अखेर दृष्टिपथात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्क्या घराचे स्वप्न अखेर दृष्टिपथात
पक्क्या घराचे स्वप्न अखेर दृष्टिपथात

पक्क्या घराचे स्वप्न अखेर दृष्टिपथात

sakal_logo
By

swt९१६.jpg
८७९३८
साळगावः जागतिक महिला दिनी ज्योत्स्ना माळकर यांचे घराचे स्वप्न पूर्ण करताना बांधकामाच्या प्रारंभ प्रसंगी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच अनघा दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
swt९१७.jpg
८७९३९
माळकर कुटुंबीयांचे सद्यस्थितीतील झोपडी वजा घर. (छायाचित्रे ः अजय सावंत)

पक्क्या घराचे स्वप्न अखेर दृष्टिपथात
साळगावात आशेचा किरणः महिलादिनी स्वप्नांना पंख
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः झोपडीतून चार भिंतींच्या घरात वावरण्याचे साळगाव गावातील गरीब महिला ज्योत्स्ना जयवंत माळकर यांचे स्वप्न अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या घरबांधणी कामाचा प्रारंभ काल (ता. ८) महिलादिनी झाला. माळकर यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम त्यांच्यासाठी आशेचे किरण ठरलेले कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले.
साळगाव येथील छत्र हरपलेल्या गरीब महिला ज्योत्स्ना माळकर यांना घर बांधून देणे या गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या स्वप्नातील कामाला काल जागतिक महिलादिनी प्रारंभ झाला आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. या आनंदातून खऱ्या अर्थाने महिलादिनाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल.
दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना अजूनही बऱ्याच महिलांच्या प्रश्न सामाजिक समस्या, आर्थिकदृष्ट्या ओढाताण, सातत्याने अन्यायाला जावे लागणे हे प्रश्न पाहता आजची स्त्री या संगणकीय युगात खरोखरच सर्वांगीण विकासाने परिपूर्ण, आत्मनिर्भर आहे का, या प्रश्नाचे उत्तर सर्रास ''नाही'' असेच मिळते. आजही समाजात वावरताना स्त्री सुरक्षित नाही, हे दिसून येते. ग्रामीण भागात तर अनेक महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक दृष्ट्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही महिलांना तर आपले कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत करत दैनंदिन जीवन जगावे लागत आहे. काही जणांना घराअभावी उघड्यावर संसार करावा लागतो, हे विदारक चित्र आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समाजात गावोगावी दिसत आहे.
असेच चित्र साळगाव येथे दिसले. नवरा व मुलीसोबत झोपडीत राहणाऱ्या माळकर या महिलेची भयावह स्थिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी तिच्या घरी जाऊन प्रत्य़क्ष पाहिली. या महिलेला घर बांधून द्यावे, हा उदात्त दृष्टीकोन जोपासूनच ते माघारी परतले. जागतिक महिला दिनी तिचे व तिच्या कुटुंबीयांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम चव्हाण यांनी केले. काल (ता. ८) पंचायत समितीच्या सर्व विभागांच्या टीमचे तिच्या घरी आगमन होताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. माळकर यांची ओटी भरून नव्या घराच्या कामाचा प्रारंभ सरपंच अनघा दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, मृणाल कार्लेकर, पूजा पिंगुळकर, एस. एस. सावंत, नंदू धामापूरकर, शेखर माळकर, विलास गोसावी, रश्मी गुरव, विनिता रायकर, मनीषा तिडके, राखी बांधेलकर, सुमित्रा पेडणेकर, विजया रसाळ, निधी कडुलकर, शीतल गंगावणे, धनश्री बावकर, दीक्षा माळकर, स्मिता माळकर, अनुसया धनवे, सोनिया पाझरे, सानिका चव्हाण, अश्विनी कुडाळकर, जयवंत माळकर, माजी उपसरपंच अमित दळवी, संतोष सावंत, ज्योत्स्ना माळकर यांची कन्या समीक्षा व ग्रामस्थ उपस्थित होते.
............
चौकट
मी तुझ्या पाठीशी आहे...
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा शब्द माझ्यासाठी आशेचा किरण ठरला. सप्टेंबर २०२२ मध्ये माझे घर पावसाने कोसळले होते. प्लास्टिक कापड घेऊन झोपडी वजा घरात आम्ही राहत होतो. अनेक संकटांना सामोरे जात असताना २५ सप्टेंबरला गटविकास अधिकारी चव्हाण यांनी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. माझ्यासह अपंग नवरा आणि पंधरा वर्षांची मुलगी यांना आधार देत त्यांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचा शब्द दिला आणि तो खऱाही करून दाखविला, असे ज्योत्स्ना माळकर यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी १८ वर्षांचा मुलगा गमावलेल्या या कुटुंबाला चव्हाण यांनी आशेचा नवा किरण दाखविला.