
रत्नागिरी- स्पर्धात्मक सायकलिंगमध्ये आलेकर बंधूंचा दबदबा
- rat९p३.jpg-KOP२३L८७८४४ प्रसाद आलेकर व विक्रांत आलेकर.
भावाभावांतील स्पर्धेमुळ सायकलिंगला नवा आयाम
आलेकर बंधूं ; स्पर्धेतून स्वतःला ओळखणे गरजेचे
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.१० : आजारी पडल्याने सायकलिंगकडे वळलो. पण कोरोना काळात भाऊ प्रसाद सुद्धा सोबत येऊ लागला आणि खेळीमेळीची स्पर्धा सुरू झाली. कमीत कमी वेळेत अंतर कसे पार करावे यावर चर्चा आणि नियोजन सुरू झाले आणि तिथूनच स्पर्धात्मक विचार पुढे आला. घाटातील सायकलिंगचा सराव, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेऊन सायकलिंग कसे करायचे, स्नायू मजबुताचे प्रशिक्षण, योग्य खाणे पिणे, स्पर्धेदरम्यान वेगवेगळे डावपेच याचा वेळेनुसार चांगला अभ्यास केला. आता प्रत्येक स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये क्रमांक पटकावतोय, असे सायकलपट्टू विक्रांत आलेकर याने सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेले विक्रांत व प्रसाद आलेकर बंधू यांनी सायकलिंग क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. विक्रांत म्हणाला की, शाळेत असताना एमटीबी सायकलवर स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत तुम्ही खूप काही शिकता जे तुम्ही प्रशिक्षणावेळी शिकू शकत नाही. प्रशिक्षणावेळी तुम्ही फक्त स्वतःला जिंकण्यासाठी तयार करता. स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. इतर स्पर्धक वेगळे काय करतात, ते जाणून आपणही केले पाहिजे. आत्मविश्वास आणि तयारी यावर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत टिकून राहू शकता.’
विक्रांत म्हणाला की, ‘सायकलिंगची आवड लहानपणापासूनच होती. शाळा, कॉलेजला रोज येऊन जाऊन १२ किलोमीटर व्हायचे. नंतर सायकलिंग बंद झाले. कोरोना काळात आजार जडला व रक्तदाब वाढला. वजन आटोक्यात आणायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मग सायकलिंगकडे वळलो आणि सायकलिंगचे व्यसनच लागले. चिपळूण सायकलिंग क्लबमध्ये दाखल झालो. सुरवातीला स्वस्त आणि टिकावू सायकल घेतल्या. पण स्पर्धेच्या गोष्टी कळू लागल्यानंतर रेसर सायकल म्हणजे बारीक टायर्स, गिअर, वजनाने हलक्या अशा रोड बाईक वापरतो.’
तिन्ही वर्षे अव्वलच
सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या हेदवी ते गणपतीपुळे या ७२ किमीच्या स्पर्धेत विक्रांत पहिला, प्रसाद तिसरा आला. जिल्हास्तरीय आमदार चषकमध्ये विक्रांत पहिला, प्रसाद दुसरा आला. रत्नागिरी ते चाफे सायक्लोथॉनमध्ये प्रसाद पहिला, विक्रांत तिसरा आला. यंदाच्या सायक्लोथनमध्ये विक्रांत पुन्हा प्रथम व प्रसाद चौथा आला. सांगली, पुणे- बारामती, मुंबई, पुण्यातील स्पर्धांमध्ये पहिल्या ८ ते १० मध्ये क्रमांक मिळवला आहे.