४01 मालमत्ता नावावर चढविण्यात अडथळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४01 मालमत्ता नावावर चढविण्यात अडथळे
४01 मालमत्ता नावावर चढविण्यात अडथळे

४01 मालमत्ता नावावर चढविण्यात अडथळे

sakal_logo
By

जिल्ह्यात ४०१ मालमत्ता दुसऱ्याच्या नावे
जिल्हा परिषदची स्थितीः प्रशासनाच्या नावे नसल्याने डागडुजीही थांबली
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः जिल्हा परिषद प्रशासनाच्या वापरात असलेल्या तब्बल ४०१ मालमत्ता अद्यापही दुसऱ्याच्या नावे आहेत. या मालमत्ता आपल्या नावे करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला गेली अनेक वर्षे झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या नावे नसल्याने डागडुजीअभावी मालमत्तांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वापरात असलेल्या परंतु स्वतःच्या नावे नसलेल्या एकूण १८७९ पैकी १४७८ मालमत्ता गेल्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आपल्या नावे करण्यात प्रशासनाला यश आले आहे; मात्र अद्यापही दुसऱ्याच्या नावे असलेल्या ४०१ मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावे करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वापरात असलेल्या परंतु दुसऱ्याच्या जमिनीत असलेल्या मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावे करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तरीही अद्याप जिल्ह्यातील ४०१ एवढ्या मालमत्ता दुसऱ्याच्या जमिनीत आहेत. या मालमत्ता नावावर करणे जिल्हा परिषद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. अनेक इमारती नादुरुस्त असल्याने नव्याने इमारत बांधणे कठीण बनले आहे. यासाठी आता प्रशासन संधीच्या शोधात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १८७९ एवढ्या मालमत्ता दुसऱ्याच्या जमिनीत होत्या. त्यामुळे या मालमत्तांची डागडुजी करणे किंवा नव्याने इमारत बांधणे प्रशासनाला अडचणीचे ठरत होते. या मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावे करण्यासाठी गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. अनेक अडचणींचा सामना करत अथक प्रयत्नांनंतर १४७८ एवढ्या मालमत्ता आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या नावे झाल्या आहेत.
अद्यापही ४०१ एवढ्या मालमत्ता नावे करण्याचे मोठे आणि कठीण आव्हान प्रशासनासमोर आहे. संबंधित मालमत्ता असलेल्या जमिनीच्या सातबारावर अनेकांची नावे असल्याने आणि काही जमीन मालक जिल्ह्याबाहेर राहत असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तेथील इमरतींची डागडुजी अथवा बांधकाम करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या इमारतींचे भवितव्य धोक्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशू दवाखाने, अंगणवाडी केंद्रे यांचा वापर जिल्हा परिषद प्रशासन करत असले तरी अशा अनेक इमारती दुसऱ्याच्या जमिनीत कार्यरत आहेत. यातील अनेक इमारती आता नादुरुस्त झाल्या आहेत; मात्र जमीन जिल्हा परिषद प्रशासनाच्या नावे नसल्याने या मालमत्तांची डागडुजी करणे अथवा नव्याने इमारतीचे बांधकाम करणे अडचणीचे ठरत आहे. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्‍यात ८९, कणकवली ३७, वैभववाडी ७२, देवगड २२, वेंगुर्ले ३२, कुडाळ ७२, मालवण ४०, दोडामार्ग ३७ अशा एकूण ४०१ मालमत्ता अद्यापही दुसऱ्याच्या (नावे) जागेत आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ३४६, कणकवली १६१, वैभववाडी १७३, देवगड ३१८, वेंगुर्ले १८८, कुडाळ ४६, मालवण २२० तर दोडामार्ग तालुक्यातील २६ मालमत्ता अशा प्रकारे एकूण १४७८ मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावे करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
...............
चौकट
या आहेत अडचणी
जिल्हा परिषदेच्या अद्यापही ४०१ एवढ्या मालमत्ता दुसऱ्याच्या नावे आहेत. या मालमत्ता नावे करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; मात्र संबंधित मालमत्तांच्या जमिनीच्या सातबारावर अनेक शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी काही जमीन मालक जिल्ह्याबाहेर राहत असल्याने त्यांना संपर्क करणे तसेच एकाच वेळी सर्व जमीन मालक उपस्थित ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे या मालमत्ता नावावर करताना अनेक अडचणी येत आहेत.
.............
चौकट
वर्षभरात प्रगती शून्य
गेल्या वर्षभरातील प्रशासकीय राजवटीत एकही मालमत्ता जिल्हा परिषद प्रशासनाच्या नावे झालेली नाही. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून गेल्या अनेक वर्षांत अनेक मालमत्ता नावे झाल्या; मात्र गेल्या वर्षभरात लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने मालमत्ता नावे करणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याचे उघड झाले आहे.
.............
कोट
"जिल्हा परिषदेच्या नावे नसलेल्या ४०१ मालमत्ता नावे करण्याचे आव्हान कठीण असले तरी प्रयत्न सोडलेले नाहीत. या जमिनीचे मालक जिल्ह्याबाहेर राहत असल्याने सणासुदीच्या कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या जमीन मालकांना भेटून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, सिंधुदुर्ग