भडगाव प्रशालेस संगीत साहित्य

भडगाव प्रशालेस संगीत साहित्य

भडगाव प्रशालेस संगीत साहित्य
कुडाळ ः कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ (कडावल) संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक प्रशालेला भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या संकल्पनेतून हार्मोनियम व तबला असे संगीत साहित्य तसेच शाळेमध्ये श्रमदान करण्यासाठी आवश्यक कृषी साहित्य प्रदान करण्यात आले. संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव वळंजू, सर्व संचालक, मुख्याध्यापक सचिन धुरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे आभार मानले.
-----------
सातार्डा परिसरात वणव्यांमुळे नुकसान
सावंतवाडीः सातार्डा गावातील काजू उत्पादन क्षेत्रात अज्ञाताकडून हेतूपुरस्सर वणवा पेटविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकरी, ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून भटवाडी, धनगरवाडी, पालवनवाडी, उत्तम स्टील कंपनी परिसरामध्ये आगीच्या वणव्याने शेतकऱ्यांच्या काजू उत्पादनाचे ऐन हंगामात नुकसान झाले. त्याबरोबरच जैवविविधता नष्ट होत आहे. पोलिसांनी अज्ञाताचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
--------------
चित्रकला स्पर्धेस
सातार्डात प्रतिसाद
सावंतवाडीः सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मांजरेकर यांनी आपल्या भाषणात शिरवाडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यानिमित्त ग्रंथालयात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंचक्रोशीतील आठ शाळांच्या एकूण ३० मुलांनी सहभाग घेतला.
--------------
सोन्सुरेवासीयांचे
२३ पासून उपोषण
वेंगुर्लेः आरवली-सोन्सुरे येथील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने २३ मार्चला आरवली ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा वयोवृध्द नागरिक विनायक राणे व सोन्सुरे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. आरवली ते सोन्सुरे रस्ता कित्येक वर्षापासून खड्डेमय आहे. याबाबत आरवली ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, पंचायत समिती यांना वारंवार निवेदने देण्यात आली; मात्र निवेदनांची दखल घेतली जात नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून धावणारी एसटी बसची फेरीही बंद करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निषेधार्थ सोन्सुरे ग्रामस्थांसह आपण २३ ला आरवली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक राणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
----------------
कलमठला विविध
धार्मिक कार्यक्रम
कणकवलीः श्री स्वामी समर्थ यांचा जयंती उत्सव व पालखी परिक्रमा सोहळा २३ मार्चला कलमठ-सुतारवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गुरुपूजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत सामुदायिक पारायण, रात्री ८ वाजता पालखी परिक्रमा, श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ चिंदर-भटवाडी यांचे नृत्यभजन व त्यानंतर महाप्रसाद होईल. भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com