सिंधुदुर्गात मुली शिक्षणात आघाडीवर

सिंधुदुर्गात मुली शिक्षणात आघाडीवर

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त...
..............
सिंधुदुर्गात मुली शिक्षणात आघाडीवर
फुलेंच्या कार्याचे प्रतिबिंबः प्रत्येक मुलीकडे किमान प्राथमिक शिक्षण
विनोद दळवीः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने समाजात ताठ मानेने वावरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे प्रतिबिंब ठळक दिसत आहे. जिल्हा शिक्षणात आघाडीवर आहे. यात मुलीही आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मुलगी किमान प्राथमिक शिक्षण घेतलेली मिळत असून मुलींच्या शिक्षणातील आघाडीमुळे जिल्हा विकासात आघाडीवर राहण्यास मदत होत आहे.
शिक्षण माणसाला ज्ञानी, आत्मनिर्भर बनविते. पारतंत्र्यात ही गरज ओळखून केवळ चूल आणि मुल यापुरती मर्यादित असलेल्या स्त्रियांना शिक्षणात आणण्याचा विडा सावित्रीबाई फुले यांनी उचलला आणि तो पेलला. त्यासाठी लोकांचे शिव्याशाप खात अंगावर शेण सुद्धा झेलले. त्याची फळे आज महिला चाखत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा याचा अंमल स्पष्टपणे दिसत आहे. जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. याला कारण भ्रूणहत्या नाही. हा फरक नैसर्गिक आहे. मुलामुलींच्या जन्मदरात तफावत असली तरी शिक्षणात मात्र ती दिसत नाही. जिल्ह्याचा गेल्या अनेक वर्षांचा दहावी आणि बारावीचा निकाल अभ्यासल्यानंतर याचा प्रत्यय येतो.
अन्य विभागांप्रमाणे सिंधुदुर्गातील मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. कला, क्रीडा, करमणूक तसेच वकील, इंजिनियर, डॉक्टर या सर्वच क्षेत्रांत मुली आघाडीवर आहेत; मात्र हा बदल अचानक घडलेला नाही. येथील समाजाने आपल्या मुलींना शिक्षणासाठी घराचा उंबरठा सहज ओलांडू दिलेला नाही, तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी सार्वजनिक चळवळ निर्माण झाली; परंतु स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणासाठी तत्कालीन संस्थांनांनी प्रयत्न केले. त्याची उदाहरणे अजूनही आपण पाहू शकतो. कारण त्या काळात सुरू झालेल्या कन्याशाळा आजही जिल्ह्यात कार्यरत आहेत.
सावंतवाडी संस्थानचे तत्कालीन बापूसाहेब महाराज यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांचे या विभागाकडे अधिक लक्ष होते. शिक्षणासाठी त्यांनी वेगळी आर्थिक तजबीज केली. यातून अनेक सकारात्मक बदल घडत गेले. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार शक्य तितका करावा, हे बापूसाहेब महाराजांचे धोरण होते. संस्थानातील इंग्रजी व मराठी शाळांमधून मुलींना मोफत शिक्षण सुरू केले. सावंतवाडीत मुलींसाठी संपूर्ण प्राथमिक व इंग्रजीच्या तीन इयत्ता शिकविणारी शाळा होती. त्यात मुख्याध्यापिका पदवीधर होत्या. मुलींना चित्रकला, गायन शिकविण्याची व्यवस्था यात असायची. पहिल्या बॅचच्या मुली जशा शिकत जातील, तसे वर्ग वाढवत मुलींसाठी स्वतंत्र हायस्कूल करण्याचे धोरण महाराजांनी जाहीर केले होते.
या सर्वांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग आज शिक्षणात आघाडीवर आहे. या आघाडीत मुलींचा सिंहाचा वाटा आहे. शासन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करते. त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शासकीय कर्मचारी गावोगावी जाऊन माहिती घेतात; मात्र यात जिल्ह्यातील एकही स्थानिक शाळाबाह्य मिळत नाही. यात मुलींचा सुद्धा समावेश नसतो. काही किरकोळ मुले मिळतात; पण त्यांत कामाच्या शोधात परजिल्हा, परराज्य येथून आलेल्या भटकंती करणाऱ्यांच्या मुलांचा समावेश असतो. यावरून येथील पालकांची सुद्धा आपल्या मुलीने शिक्षण घेतले पाहिजे, अशी मानसिकता झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृती जागविताना त्यांनी पुरुषप्रधान काळात मुलींच्या शिक्षणासाठी टाकलेल्या धाडसी पावलांची आठवण झाली पाहिजे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे आज जिल्ह्यातील मुली शिक्षणासारख्या प्रवाहात कोणाचीही आडकाठी न येता ज्ञानार्जन करीत आहेत. येथील महिला सुद्धा कर्तबगार म्हणून कार्यरत असून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. स्मृती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या आठवणी जागविताना मुलींच्या शिक्षणासाठी झेललेल्या असंख्य यातनांना प्रणाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com