सिंधुदुर्गातून जाणार गोवा - नागपूर महामार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गातून जाणार गोवा - नागपूर महामार्ग
सिंधुदुर्गातून जाणार गोवा - नागपूर महामार्ग

सिंधुदुर्गातून जाणार गोवा - नागपूर महामार्ग

sakal_logo
By

सिंधुदुर्गातून जाणार गोवा - नागपूर महामार्ग
हमरस्त्यासाठी ८६ हजार कोटींची तरतूद; सागरी महामार्गाला चालना देण्याची ग्‍वाही
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-गोवा शक्तिपीठ या नव्या महामार्गाची घोषणा अर्थसंकल्‍पात केली आहे. या महामार्गासाठी तब्‍बल ८६ हजार ३०० कोटींची तरतूदही आहे. २०२८ पर्यंत महामार्ग पूर्णत्‍वास जाण्याची शक्‍यता आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्‍यांच्या काही गावांतून हा नवा सहापदरी महामार्ग जाणार असल्‍याने जिल्ह्याची विकास प्रक्रिया गतिमान होणार आहे.
मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्ग बारा वर्षे रखडला असला तरी वर्धा येथील पवनार ते गोवा हद्दीवरील पत्रादेवीपर्यंत जाणारा नवा सहापदरी शक्ति‍पीठ महामार्ग येत्‍या पाच वर्षांत पूर्णत्‍वासाठी राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार तयारी केली आहे. अर्थसंकल्‍पात या शक्ति‍पीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा फडणवीस यांनी केल्‍याने सिंधुदुर्गवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सध्याच्या सागरी महामार्गाला आठ ते दहा किलोमीटर समांतर हा नवा महामार्ग असणार आहे. या महामार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम एलएन मालवीय, मोनार्च सर्व्हेअर आणि टीपीएफ इंजिनिअरिंग आदी कंपन्यांकडे देण्यात आले असून डिसेंबर अखेरपर्यंत आराखडा पूर्ण होणार आहे. त्‍यानंतर तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. शक्ति‍पीठ महामार्गाची लांबी ७६० किलोमीटर असणार आहे.
फडणवीस यांनी दिलेल्‍या माहितीमध्ये शक्ति‍पीठ महामार्गामध्ये माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई या तीन शक्ति‍पीठांबरोबरच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर), औदुंबर (जि. सांगली) आणि सिंधुदुर्गातील कुणकेश्‍वर मंदिर या महामार्गाला जोडले जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर आठ ते दहा तासांत पार होणार आहे. हा महामार्ग ग्रीनफिल्‍ड असल्‍याने जुन्या रस्त्याचे किंवा महामार्गाचे नव्या महामार्गात रुरूपांतर केले जाणार नाही, तर पूर्णत: नवीन भागातून रस्ता बांधला जाणार आहे. त्‍यामुळे सध्याचा राष्‍ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित सागरी महामार्ग यामधील अनेक गावे विकासाच्या प्रक्रियेत येणार आहेत.

सागरी महामार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्‍पात चाळीस वर्षे रखडलेल्‍या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या सागरी महामार्गाच्या पूर्णत्‍वासाठीही निधीची तरतूद केल्‍याची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्‍पात केली. सागरी महामार्गाचे डीपीआर गतवर्षीच तयार करण्यात आले आहेत. यंदा अर्थसंकल्‍पात निधीची तरतूद झाल्‍याने सागरी महामार्गाचेही काम लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा जिल्‍हावासीयांना आहे.

काजू बोर्डासाठी २०० कोटींची तरतूद
अर्थमंत्री फडणवीस यांनी काजू बोर्डासाठी २०० कोटींच्या भागभांडवलाची तरतूद जाहीर झाली आहे. काजू फळ विकास योजनेसाठी १३२५ कोटींची तरतूद केली आहे. यात काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र आणि काजू फळ विकास योजनेद्वारे उत्पन्न दुप्पटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला सातपट भाव मिळणार आहे. उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन केले जाणार आहे. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबविली आहे.