
चिपळूण -पिंपळी, खडपोलीचा परिसर पुराच्या छायेखाली
rat९p३७.JPG--KOP२३L८८००७
खडपोली ः येथे वाशिष्ठी नदीत गाळाचे असे बेट तयार झाले आहे (मुझफ्फर खान ः सकाळ छायाचित्रसेवा)
पिंपळी, खडपोली परिसर पुराच्या छायेखाली
गाळ उपसा ठप्प ; वाशिष्ठीतील गाळाच्या बेटाचा धोका
चिपळूण, ता. ९ ः पिंपळी नांदिवसे मार्गावर खडपोली येथे वाशिष्ठी नदीत गाळाचे बेट तयार झाले आहे. हे बेट न काढल्यास खडपोलीसह पिंपळी परिसराला पुराच्या पाण्याचा धोका आहे. मात्र शासनाकडून गाळ उपसा ठप्प झाला आहे. गाळ काढण्यासाठी निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे पिंपळी आणि खडपोली परिसरातील नागरिक पुन्हा पुराच्या छायेखाली आहेत.
वाशिष्ठी नदीपात्रात खडपोली येथे जुना डोह होता. त्याच परिसरात आता तीन ते चार मीटर उंच गाळाचे बेट तयार झाले आहे. त्यावर गाळाच्या मातीचे थर आहेत. या मातीच्या थरात दगड - गोटे असलेला गाळ आहे. वाशिष्ठी नदीपात्रात वाहून आलेला हा गाळ खडपोली परिसरातील सखल भागात पसरला आणि वर्षानुवर्षे साठला आणि त्याचे बेट तयार झाले आहे. या गाळाच्या बेटावर पूर्वी विट बनविण्याचा व्यवसाय केला जात होता. मात्र सध्या झाडी उगवली आहेत. या बेटामुळे खडपोली आणि पिंपळी परिसरात नदीचा प्रवाहही वारंवार बदलत आहे. पावसाळ्यात नदी किनारी वसलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी जाते त्यामुळे नदी लगतच्या घराना या बेटाचा धोका आहे. बेटामुळे पुराच्या पाण्याचा मार्ग बदलत आहे. पाण्याच्या प्रवाहाला नैसर्गिक अडथळा ठरत असलेला हा बेट काढण्याची मागणी मागील वर्षापासून गेली जात आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात चिपळूणात पूर आला. तेव्हा त्याचा ताप खडपोली, पिंपळीसह परिसरातील गावांना झाला. खडपोली येथे बेटाच्या समोर नदीवर पूल उभारण्यात आला आहे. या पुलावरून एमआयडीसीची जलवाहिनी वाहून गेली होती. परिसरातील शेतीसह बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.
खडपोलीचा परिसर गाळ काढण्याच्या दुसऱ्या टप्यातील कार्यक्रमात येतो. सद्यस्थितीत दुसऱ्या टप्यातील गाळ काढण्याचे काम निधीअभावी थांबवण्यात आले आहे. पावसाळा जवळ आला आहे. शासनाकडून गाळ काढण्याच्या कामासाठी दमडीही मंजूर झालेली नाही. पहिल्या टप्यातील गाळ गाळ काढण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्यात जलसंपदा विभागाकडून गाळ काढण्याचे सुरू झालेले काम थांबवण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे.
कोट
खडपोली, पिंपळी परिसरातील वाशिष्ठी नदीत साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. नदी पात्रात मोठे बेट तयार झाले आहे. ते प्राधान्याने तोडण्याची गरज आहे. आम्ही ग्रामस्थ जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत आहोत मात्र निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता गाळ काढण्यात यावा.
- मुराद अडरेकर, खडपोली ग्रामस्थ