सदर-  ‘काळ’ कर्ते शि.म. परांजपे

सदर- ‘काळ’ कर्ते शि.म. परांजपे

rat१०१६.txt

बातमी क्र. १६ (सदर)
------------
(४ मार्च टुडे चार)

इथे साहित्याची नगरी
फोटो- rat१०p७.jpg -
८८०८८
शि.म. परांजपे

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीला झाला. मायबोलीचा हा महोत्सव उत्साहात साजरा होत असताना प्रकर्षाने आठवण आली ती ‘काळ’ कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा ओम डौलदार आणि आशयसंपन्न लेखनाचा आदर्श म्हणजे त्यांचे काळ साप्ताहिकातील लेख. ‘शि.म.परांजपे म्हणजे निर्भेळ स्वातंत्र्यांच्या कल्पनेची स्फूर्ती देणारे’ अशा शब्दात त्यांचे वर्णन अच्युतराव कोल्हटकर यांनी केले आहे.

- प्रकाश देशपांडे, इतिहासाचे साहित्याचे अभ्यासक

-

‘काळ’ कर्ते शि.म. परांजपे

शि.म.परांजपे यांचा जन्म आजच्या रायगड जिल्ह्यात महाड येथे २७ जून १८६४ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलची ओढ निर्माण झाली होती. महाड जवळच असलेली शिवप्रभूंची राजधानी रायगड त्यांना दिसत होती. आपले राज्य हरपले याचे शल्य होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाडला झाले. महाडला इंग्रजी शिक्षणाची सोय नसल्याने वडिलांनी त्यांना रत्नागिरीच्या हायस्कूलात शिकायला पाठवले. इथे त्यांना गुरू लाभले विष्णुशास्त्री चिपळूणकर. ‘मराठी भाषेचे शिवाजी’ असे ज्यांचे वर्णन करतात ते विष्णुशास्त्री इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या भाषांवर विलक्षण प्रभूत्व असलेले व्यक्तिमत्व. शास्त्रीबुवा जरी सरकारी शाळेत शिक्षक असले तरी त्यांच्या मनी पारतंत्र्यांची प्रचंड चीड. हे विचार विद्यार्थी असलेल्या शिवरामपंतानी आत्मसात केले. विष्णुशास्त्रींची बदली पुण्यात झाली आणि त्यांचा हा विद्यार्थीही गुरूंच्या मागोमाग पुण्याला आला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने शाळेत शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषयात सर्वोच्च गुण मिळाले आणि त्याना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली पुढे डेक्कन कॉलेजमधून बी. ए. व एम्. ए. केले. इंग्रजांची चाकरी करायची नाही हा निश्‍चय असल्याने पुण्यातच महाराष्ट्र कॉलेज येथे संस्कृतचे प्राध्यापक झाले. मात्र शासकीय अवकृपेचा वरवंटा या महाविद्यालयावर फिरला आणि महाविद्यालय बंद झाले. शिवरामपंत उत्तम वक्ते होते. ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने होत. व्याख्यानात देशकाल परिस्थिती आणि पारतंत्र्य यावर भाष्य असल्याने त्यांची व्याख्याने लोकप्रिय होत. लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता. लोकमान्य ‘केसरी’ मधून जनजागृती करत होते. शिवरामपंतानी १८९८ च्या चैत्र शुध्द प्रतिपदेला ‘काळ’ साप्ताहिक सुरू केले. उपरोध, वक्रोक्ती, व्याजोक्ती ही त्यांच्या लेखनात पुरेपूर भरलेली असे’काळ‘ सुरू करताना त्यांनी गुलामगिरीची जाणीव करून देऊन स्वातंञ्याची आकांक्षा उत्पन्न करण्यासाठी आपले साप्ताहिक आहे. याची मानाशी खणगाठ बांधली होती. १८९८ ते १९०८ या नऊ दहा वर्षात ‘काळ’ साप्ताहिकाने वाचकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. केसरी पेक्षाही ‘काळ’ चा खप अधिक होता. अखेर १९०८ साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला झाला. विशेष म्हणजे न्यायाधीशांना शिवरामपंताची वक्रोक्ती आणि व्याजोक्ती कळणार कशी ? मराठी भाषेचे हे वैशिष्य न्यायाधीशांसाठी अवघड झाले होते. मात्र त्यांना दोषी ठरवायचे अगोदरच निश्‍चित झाले असल्याने एकोणीस महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली गेली. पुढे प्रेसअ‍ॅक्टने १९१० साली दहा हजाराचा जामीन मागितला एवढी रक्कम उभी करणे अशक्य झाल्याने १९१० साली ‘काळ’ साप्ताहिक बंद पडले. इतकेच नाहीतर शिवरामपंतानी‘काळ ’साप्ताहिकात वेळोवेळी लिहिलेल्या अग्रलेखांचे ‘काळातील निवडक निबंध ’हे पुस्तकही जप्त करण्यात आले. ज्यांना मराठी भाषेची श्रीमंती समजून घ्यायची असेल त्यांनी काळातील निवडक निबंधाचे खंड आवर्जून वाचायला हवेत.
लोकमान्यांना ‘असंतोषाचे जनक’ म्हणतात. मात्र १८८८ ते १९०८ या काळात शिवरामपंतांनी आंग्लसत्ते विरूध्द लेखणी आणि अमोघ वाणी यांच्या माध्यमातून लिहिलेले लेख दिलेली व्याख्याने यामुळे लोकमान्यांइतकेच शिवरामपंतही असंतोषाचे निर्माते होते हे नक्की. आपली पुराणे, इतिहास यातले निवडक प्रसंग शोधून अत्यंत निरूपद्रवी आणि सालस असा मथळा देऊन काळकर्ते जे लिहित ते प्रखर राष्ट्रभावना जागृत करणारे असे होते. ‘सहयाद्रीच्या तावडीत सापडलेली कल्पनाशक्ती’ ‘पितृतर्पण’ ‘शिवाजीचे पुण्याहवाचन’ ‘देहूहून परत येताना’ अशा अनेक निबंधाचे शीर्षक निरूपद्रवी दिसले तरी त्यात स्वातंत्र्यप्रेम रसरशीतपणे दिसून यायचे. ‘सहयाद्रीच्या तावडीत’ या निबधांत ते लिहितात ‘शिवाजी महाराजांचे मावळे हे याच पार्वताच्या पोटामधून बाहेर पडले आणि त्यांच्याच वंशजांनी स्वातंत्रतेचे झेंडे चंदी चंदावर पासून अटकेच्या अटके पर्यन्त नाचविले. ज्यांच्या पोटातून असली प्रजोत्पत्ती करण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्या पोटातून फिरूनही कदाचित तसलीच प्रजा पुन्हा निर्माण होणार नाही कशावरून. परमेश्‍वराची लीला अगाध आहे’ लेखकाला सहयाद्री पाहता पाहता त्याच्या कल्पनेला फुटलेले हे धुमारे स्वातंत्र्याचाच उद्घोष करणारे दिसतात. एखादा लेख लिहिताना शिवरामपंताची लेखणी कशी धारदार बनते हे‘शिवाजीचे पुण्याहवाचन’ या निबंधात स्पष्टपणे जाणवते.
आपली भूमी पारतंत्र्यात आहे, दुःख असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्नान करून पहाटेच सहयाद्रीच्या शिखरावर जातात. तिथे त्यांना समाधी लागते आणि ’आपल्या देशाची अशी स्थिती राहता कामा नये. आपल्या जन्मभूमीला गुलामगिरी म्हणजे आपल्या तोंडाला काळोखीच होय. ही आर्यभूमी स्वतंत्र्य झाली पाहिजे. आपल्या देश बांधवांच्या पायातील पारतंत्र्याच्या शृंखला तोडून टाकण्याची इच्छा माझ्या मनात उत्पन्न होत आहे. ती माझी इच्छा सर्व देवतांनी परिपूर्ण करावी’ या संपूर्ण लेखात कुठेही इंग्रज सत्तेचा किंचितही उल्लेख नाही. मात्र शिवरामपंत छत्रपतींच्या समाधी अवस्थेत त्यांना जे दर्शन घडवितात ते वर्तमानातील पारतंत्र्याचेच. शिवरामपंत शिक्षा भोगून १९१० साली बाहेर आले. ‘काळ’ बंद पडला होता. १९१० ते १९२० या दहा वर्षाच्या काळात त्यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध प्रकारचे लेखन केले. १९२० साली त्यांनी‘ स्वराज्य ’साप्ताहिक सुरू केले. या दहा वर्षात राजकारणात अनेक बदल झाले. १९२० साली लोकमान्यांचे निधन झाले. स्वातंत्र्य चळवळीत महात्माजींचे नेतृत्व उदयाला आले. शिवरामपंतांनी महात्माजींचे नेतृत्व स्वीकारले. १९२२ साली सेनापती बापटांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. यावेळी त्यांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली. १९२९ साली बेळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याच वर्षी २७ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचे निधन झाले. इंग्रजसत्तेने ’काळातील निवडक निबंध‘ ग्रंथावर घातलेली बंदी त्यांच्या हयातीत उठली नाही. पुढे १९४६ साली ही बंदी उठली. शिवरामपंताना १९ महिन्यांची शिक्षा झाली, त्यावेळी हायकोर्टातील ज्युरीला उद्देशून ते म्हणाले होते. ‘वाटेल तर मला आपण दोषी ठरवून शिक्षा करा. मी भोगायला तयार आहे. पण देशभक्ती सारख्या उज्ज्वल कल्पनेला गुन्हेगारीचे काजळ फासू नका’’. धगधगणारी देशभक्ती घेऊन शिवराम महादेव परांजपे अखेरपर्यंत जगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com