रॉकगार्डनचा म्युझिकल फाउंटन नादुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रॉकगार्डनचा म्युझिकल फाउंटन नादुरुस्त
रॉकगार्डनचा म्युझिकल फाउंटन नादुरुस्त

रॉकगार्डनचा म्युझिकल फाउंटन नादुरुस्त

sakal_logo
By

88132
मालवण ः रॉकगार्डनमधील बंद असलेला म्युझिकल फाउंटन.


रॉकगार्डनचा म्युझिकल फाउंटन नादुरुस्त

मालवणात पर्यटकांचा हिरमोड; पालिकेचे आर्थिक उत्पन्नही बुडाले

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० ः पर्यटकांचे खास आकर्षण असलेले रॉकगार्डनमधील म्युझिकल फाउंटन सध्या बंदावस्थेत असून प्रशासकीय राजवटीचा याला फटका बसला आहे. परिणामी रॉकगार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिवाय पालिकेचे आर्थिक उत्पन्नही बुडाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
मालवण हे पर्यटन शहर आहे आणि दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ हा वाढताच आहे. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायव्हिंग, वॉटरस्पोर्ट्स, मालवणी जेवण हे पर्यटकाच्या पसंतीस उतरले आहे. यामध्ये सध्या रॉक गार्डनची भर पडली आहे. समुद्राच्या कुशीतल हे गार्डन अल्पावधीतच पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने उद्योग सुरू होऊन रोजगाराची संधी स्थानिकांना उपलब्ध झाली आहे. अशा ठिकाणी जर मोठ्या शहराच्या धर्तीवर म्युझिकल फाउंटन बसवला तर पर्यटनाच्या दृष्टीने ते योग्य आणि जादा पर्यटक आकर्षित होणार ठरणार हे गृहीत धरून आमच्या कालावधीत या ठिकाणी पर्यटन निधीतून सुमारे १ कोटी रुपये निधी मंजूर करून घेऊन म्युझिकल फाऊंटन कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक लोकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. परंतु, मागील चौदा महिन्यापासून लोकप्रतिनिधीचा कालावधी संपून प्रशासक कालावधी सुरू झाला आणि रॉक गार्डनच्या या सुविधाकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील महिनाभर म्युझिकल फाऊंटन बंद आहे. त्याठिकाणची म्युझिक सिस्टिमही बंद आहे. त्यामुळे फाऊंटन बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
या ठिकाणी लहान मुलांसाठी बोट रायडिंगसाठी दोन लहान तलाव बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी बोटींगपासून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत होते. पण, नादुरुस्त बोटीचे कारण सांगून बोटिंग मागील वर्षभर बंद आहे. जुन्या बोटी दुरुस्तीबाबत किंवा नविन बोटी खरेदीबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामूळे मुलांसाठी असणारे एक मनोरंजनाचे ठिकाण कमी झाले आणि त्यामुळे यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान पण झाले आहे.
म्युझिकल फाऊंटन बसविल्यानंतर या ठिकाणी नाममात्र पाच रुपये प्रवेश फी बसविण्यात आली आहे. ज्यामुळे पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे. पण, योग्य नियोजन नसल्याने लाखो पर्यटक भेट देऊनही त्यामानाने फी ची रक्कम प्राप्त झालेली नाही. परिणामी पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा आणि शहर सुशोभीकरणात भर पडावी या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेला हा कारंजा गेली सात ते आठ महिने बंद आहे. त्याचप्रमाणे गेट तुटून पडले आहे. लाईट बंद पडल्या आहेत. याबाबत सूचना देऊनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही. मालवणच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करायचे, मंत्रालयाच्या चकरा मारून आपल्या आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून विकासकामे करायची आणि प्रशासकीय राजवटीत जर प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे, हम करेसो कायदा अशाप्रकारे मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या विकास कामाच्या दुरुस्ती देखभालीबाबत हेळसांडपणा होत असेल तर ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत ज्या पालकमंत्र्यांच्या कालावधीत निधी मंजूर झाला आहे, त्या पालकमंत्र्यांना या बाबी निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
--------------
चौकट
पर्यटकांसमोर असंख्य अडचणी
मालवणात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. येथे लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करेपर्यंत मागील दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या आणि दुरुस्ती देखभालचे टेंडर न केल्याने बंद असलेल्या बायोटॉयलेट गाड्यापैकी एक गाडी याठिकाणी ठेवण्याबाबत सूचना करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि पर्यायाने पालिकेची आणि पर्यटनदृष्ट्या मालवणची बदनामी होत आहे.
------------
चौकट
प्रशासक कालावधीमुळे विकासकामे रखडली
प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या कालावधीत आपापल्या परीने पर्यटनाच्या दृष्टीने हे रॉक गार्डन जास्तीत जास्त कसे आकर्षित दिसेल, याबाबत मेहनत घेतली आहे; पण, सध्या प्रशासक पदाच्या १४ महिन्याच्या कालावधीतील दुर्लक्षामुळे ही अशी दुर्दशा झाली आहे. प्रशासकांना वेळोवेळी कळवून, निदर्शनास आणूनही ही परिस्थिती उद्भवली आहे. याला जबाबदार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्तीकडे असल्याने आणि त्यावर कोणाचाच अंकुश नसल्याने सर्वच विकासकामांबाबत ही स्थिती असल्याची खंत श्री. कांदळगावकर यांनी व्यक्त केली.