
कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या 11 जावांचा सन्मान
काही सुखद--लोगो
rat१०p३.jpg
८८०५७
चिपळूणः एकत्र कुटुंबातील महिलांचा सन्मान करताना माजी सभापती पूजा निकम व सहकारी.
------------------
कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या ११ जावांचा सन्मान
राधा गोविंद फाउंडेशनचा उपक्रम; वाडीनिहाय सर्वेक्षण करून निवड
चिपळूण, ता. ९ः बदलत्या आधुनिक काळात कुटुंब पद्धतीत बदल होत आहे. एकत्र कुटुंबाची जागा विभक्त कुटुबांनी घेतली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक कुटुंबानी संयुक्त कुटुंबपद्धतीचा पसंती दिली. ३० ते ४० वर्षे ही कुटुंबे एकत्र वास्तव्याला आहेत. त्यांनी अजुनही दुसरी चूल मांडलेली नाही. अशा एकत्र कुटुंबात मोलाचे योगदान देणाऱ्या सावर्डेतील ११ कुटुंबातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
सावर्डे येथील राधा गोविंदा फाउंडेशनच्या संस्थापक पूजा निकम, मार्गदर्शक युगंधरा राजशिर्के, पूर्वा निकम यांच्या सुंदर माझे घर संकल्पनेतून सावर्डे गावातील एकत्र कुटुंब जोडून ठेवणाऱ्या एकूण ११ कुटुंबातील जावाजावांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. पूजा निकम म्हणाल्या, बदलत्या काळात कुटुंब पद्धतीत बदल होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कुटुंब पद्धतीत बदल जाणवतोय. मुले, मुली नोकरीनिमित्ताने विविध ठिकाणी धाव घेतात. परिणामी अनेकजण तिकडेच नोकरी, व्यवसायासाठी वास्तव्य करतात. कुटुंब एकत्र ठेवण्यात महिलांची भूमिका मोठी असते. आजही ग्रामीण भागात तीन-तीन पिढ्या एकत्रच राहत आहेत. एकत्र कुटुंबातही वादाचे प्रसंग येतात. मात्र तरीही ही कुटुंबे नात्यांनी घट्ट विणली गेली आहेत. त्यामुळे एकत्र कुटुंबात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान होण्यासाठी माजी सभापती पूजा निकम यांनी पुढाकार घेतला. सावर्डेतील वाडीनिहाय सर्व्हेक्षण केले. त्यानुसार ११ कुटुंबे शोधण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून या कुटुंबातील जावा-जावांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मानसी लकेश्री व नेहा लकेश्री, सईदा माद्रे-फैनिदा माद्रे- राहत माद्रे-शबाना माद्रे -सलमा माद्रे, पुनम पाकळे-मेघा पाकळे, सानिका भुवड-प्रगती भुवड, शीतल राजेशिर्के-तृप्ती राजेशिर्के, दिपा बांबाडे- स्वरा बांबाडे, सिमा गुजर-गायत्री गुजर, शायरा सय्यद-निलोफर सय्यद-तासिना सय्यद, जहीरा सय्यद, नेहा खलपे-सफाना खलपे, शुभांगी सावंत-विनीता सावंत, शुभ्रा वारे-श्रुती वारे या जावा-जावांचा सत्कार करण्यात आला. सावर्डेत प्रथमच अनोखा कार्यक्रम राबविल्याने महिलांनी फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अनेक महिलांनी एकत्र कुटुबांची गरज व्यक्त केली. यानिमित्ताने नृत्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी सहभागी होत धमाल केली. कार्यक्रमाला राधा गोविंद फाउंडेशनच्या सदस्या सई निकम सुर्वे, वैशाली पाटील, प्रिया विचारे, वर्षा खानविलकर, अरुणा घाडगे, विद्या कुसुमडे, मीरा जोशी, सौ. धनावडे व भारती तारे उपस्थित होत्या.
कोट
संयुक्त कुटुंबात राहताना जर जावा-जावांनी एकमेकींना समजून घेतले तर बहिणीसारखे सुखदुःख वाटून सर्व कुटुंब आनंदी ठेवता येते. कार्यक्रमातून हा संदेश महिलांना मिळाला आहे.
- मानसी लकेश्री व नेहा लकेश्री, सावर्डे