
उत्पादन कमी असूनही काजु घसरला
88143
वैभववाडी ः जिल्ह्यात सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे.
उत्पादन कमी तरीही काजू घसरला
बागायतदार अस्वस्थ; बीच्या दरात प्रतिकिलो ६ रुपयांनी घट
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १० ः काजू बी च्या दरात प्रतिकिलो ५ ते ६ रूपयांनी दरात घसरण झाली आहे. उत्पादन कमी असल्यामुळे बागायतदारांना दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात दरात घसरण झाल्यामुळे बागायतदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर सतत ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यामुळे झालेले नुकसान, प्रचंड धुके आणि ३९ डिग्री सेल्सिअश पेक्षा वाढलेले तापमान याचा एकंदर परिणाम यावर्षी काजू उत्पादनावर झाला आहे. धुक्यामुळे तर मोहोर अक्षरक्षः काळवंडला. त्यामुळे यावर्षी फेब्रुवारी संपत आला तरी अपेक्षित काजु बी बाजारपेठेत आलेली नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काही प्रमाणात काजु जिल्ह्यात दिसत आहे. काजु हंगामाच्या सुरूवातीला यावर्षी प्रतिकिलो १२० ते १२५ असा दर व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यामध्ये काहीशी सुधारणा होऊन १३० पर्यंत काजू बी च्या दरात वाढ झाली होती; परंतु या आठवड्यपासून काजू बी च्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. लहान आकाराची काजू बी ११८ तर मोठ्या आकाराची काजू बी १२२ ते १२५ रूपयाने खरेदी केली जात आहे. ज्यावेळी उत्पादन कमी असते, त्यावेळी दरात वाढ होते, असे सर्वसाधारण गणित मांडले जाते; परंतु यावर्षी काजुच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असताना देखील काजु बी च्या दरात घसरण होत असल्याने काजु बागायतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
----------
कोट
काजू बी ला प्रतिकिलो १२२ रूपये उत्पादन खर्च येतो. त्यामुळे साधारणपणे १४० रूपये प्रतिकिलो कमीतकमी मिळणे आवश्यक आहे; परंतु प्रत्यक्षात उत्पादन खर्चाइतकाही दर बागायतदाराला मिळत नाही. त्यामुळे काजुचे उत्पादन घ्यावे कि घेऊ नये, अशा विचारात आम्ही आहोत. शासन देखील हमीभाव किवा सपोर्ट प्राईजचा विचार करीत नाही, ही आमच्या दृष्टीने शोकांतिका आहे.
- संदेश देसाई, काजू बागायतदार, कळणे, दोडामार्ग
---------
कोट
राज्याने अर्थसंकल्पात काजू बोंडू प्रकिया उद्योगांसाठी निधीची घोषणा केली; परंतु अशा स्वरूपाच्या घोषणा यापुर्वी देखील करण्यात आलेल्या आहेत; परंतु काजुला हमीभाव किवा गोव्याच्या धर्तीवर सपोर्ट प्राईज देण्याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काजू उत्पादकांसमोर काजू बी दराचा विषय आजही पुर्वीप्रमाणे कायम आहे. किमान १४० रूपये दर काजू बी ला मिळाला तरच काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू पीक परवडेल, अशी स्थिती आहे.
- विलास सावंत, फळपीक उत्पादक संघ, सावंतवाडी-दोडामार्ग
--
सध्याचा दर, उत्पादन अन् खर्च
- लहान आकाराची काजू बी - ११८ रू.
- मोठ्या आकाराची बी - १२२ ते १२५ रू.
- प्रतिकिलो येणारा उत्पादन खर्च १२२ रू.
- साधाराणपणे बागायतदारांना अपेक्षित दर १४० रू.