भविष्यातील काजू उद्योगावर बोट

भविष्यातील काजू उद्योगावर बोट

88186
नेमळे ः महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात कर्नाटक कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष गोपीनाथ कामत यांच्या हस्ते झाली.

भविष्यातील काजू उद्योगावर बोट

नेमळेत कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्सची सभा; विविध विषयांवर चर्चा

वेंगुर्ले, ता. १० ः महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान काजू उद्योगाबाबत उपस्थितांना आवश्यक माहिती देण्यात आली. या सभेत काजू उद्योगासाठी लागणाऱ्या २७ मशिनरी प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. याचा फायदा सिधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तर काही प्रमाणात सांगली, सोलापूर, नागपूर भागातील उपस्थित उद्योजकांना झाला.
महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेमळे येथील हॉटेल आराध्य येथे ५ व ६ मार्च या दोन दिवसांत झाली. कार्यक्रमाची सुरुवात कर्नाटक कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष गोपीनाथ कामत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी केसीएमएचे उपाध्यक्ष तुकाराम प्रभू, माजी अध्यक्ष प्रकाश कलबावी, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, उपाध्यक्ष भास्कर कामत, सेक्रेटरी बिपिन वरसकर, खजिनदार सिद्धार्थ झांटये आदी उपस्थित होते. तुकाराम प्रभू यांनी काजू व काजूची आजची परिस्थिती व पुढील येणाऱ्या हंगामात काजूची परिस्थिती, परदेशातील काजू स्थिती याबाबत मार्गदर्शन केले. प्रकाश कलबावी यांनी भारतातील चालू हंगामातील काजू विक्री व आगामी काळात येणाऱ्या मागणीची विस्तृत माहिती दिली. सुरेश बोवलेकर यांनी नविन उद्योजकांना सामाविष्ट करण्याचे आवाहन केले. शासनाकडून फळपिक विकास योजना शेतकरी व उद्योजकांना समजावून सांगण्यासाठी काही दिवसांत मिटींग घेण्यात येणार असल्याचे सांगून सद्यस्थितीत उद्योगाला येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. बोवलेकर यांनी दिले. ओरिसा कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सावंत यांनी ओरिसामधील काजू उद्योगाची कल्पना दिली. त्यानंतर काजूवरील संशोधक डॉ. गजभिये यांनी महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या काजूच्या झालेल्या परिक्षणाबद्दल माहिती देऊन चालू हंगामात मे महिन्याच्या अखेरपर्यंत काजूचे उत्पादन सर्व ठिकाणी समाधानकारक राहिल, असे सांगितले.
---
समितीत बदल नाही
सीए दाभोलकर यांनी बजेटमधील उद्योगाला मिळणाऱ्या योजना व नविन जीएसटी व इन्कम टॅक्सबद्दल माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील काजू बीला किफायतशीर दर देण्यासाठी सर्व उद्योजकांबरोबर अध्यक्षांची चर्चा होऊन तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. या दोन दिवसांच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र व गोवा येथील उद्योजक, काजू व्यापारी, छोटे उद्योजक असे एकूण ४५० जण उपस्थित होते. महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कमिटीत कोणताही बदल न करता तिच पुढे कार्यरत ठेवली.
-------
काजू फळपीक योजनेला
बजेटमध्ये अर्थसहाय्य

कॅश्यू मॅनुफॅक्चरर्सने मानले आभार

वेंगुर्ले, ता. १० ः काजू फळपीक योजनेला भरीव अर्थसहाय्य तरतूद केल्याबद्दल शासनाचे महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आभार मानले आहेत. राज्यातील काजू उद्योगाला व्हॅट परतावा योजना नवीन जीएसटी करप्रणाली लागू केल्याने १ जुलै २०१७ पासून बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनने शेतकरी, रोजगार, उद्योजक या सर्वांचा विकास होण्याच्या दृष्टीने शासनाकडे काजूचे सर्वांगीण विकास धोरण येण्यासाठी वारंवार भेटी घेतल्या. त्यानंतर १८ जुलै २०१८ ला काजूचे सर्वकष विकास धोरणांतर्गत काजू फळपीक विकास समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले. या समितीत महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्या सर्व स्तरावर बैठका घेऊन काजूचे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने योजना तयार करून शासनाला देण्यात आली. ही योजना शासन निर्णय जीआरद्वारे गेल्या पंधरा दिवसात जाहीर होऊन बजेटमध्ये त्यासाठी १३४५ कोटीची आर्थिक तरतूद केल्याबद्दल महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे शासनाचे आभार मानत असल्याचे अध्यक्ष सुरेश बोवलकर यांनी सांगितले आहे. या फळपीक योजनेद्वारे रोपवाटिका सुविधा निर्माण करणे, काजूची उत्पादकता वाढविणे, काजू बोंडवरील प्रकियेस चालना देणे, शेतकरी व काजुप्रकल्प धारकांना अर्थसहाय्य करणे, रोजगार निर्मिती करणे अशी उद्दिष्टे आहेत. ही योजना विस्तृतपणे उद्योजकांना, शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी तयार केलेले डायरेक्टर यांना महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे निमंत्रित केले आहे. त्यांच्या सोबत बैठक घेण्यासाठी दिवस निश्चित करून सर्वांना आमंत्रित केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com