एन्‍रॉन पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष

एन्‍रॉन पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष

एन्‍रॉन पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष
दुरुस्तीच्या आदेशाला केराची टोपली; महापुरात खचल्याने वाहतूक बंद
चिपळूण, ता. १० : महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्‍रॉन पुलाच्या दुरूस्तीचे काम अजूनही रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिल्या नंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अतिवृष्टीत व महापुरात एन्‍रॉन पूल मध्यवर्ती भागात खचला. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत आहे. शिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापच्या अंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या एन्‍रॉन पुलाची तातडीने दुरूस्ती व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर केला. या पुलाच्या कामासाठी आवश्‍यक बाबींची पुर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन वेळा निविदा प्रक्रिया पार पडली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये देवरे ॲण्ड कंपनीला या कामाचा ठेका मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे यांनी महिनाभरापूर्वी ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले. परंतु अद्याप या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरु केलेले नाही. त्यामुळे या भागातील व गुहागर मार्गावरील वाहतुकदारांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी न लागल्यास आणखी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com